वसईत महावितरणची थकबाकी २०० कोटींवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 12:42 AM2021-02-28T00:42:21+5:302021-02-28T00:42:33+5:30

बिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित 

MSEDCL's arrears over Rs 200 crore in Vasai! | वसईत महावितरणची थकबाकी २०० कोटींवर !

वसईत महावितरणची थकबाकी २०० कोटींवर !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नालासोपारा : महावितरणच्या वसई मंडळात वीजबिल थकबाकी तब्बल २०० कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. या विक्रमी थकबाकीसह चालू वीजबिल वसूल करण्यासाठी सध्या वसई व विरार विभागात व्यापक मोहीम सुरू आहे. चालू वीजबिलासह थकबाकी भरून कठीण आर्थिक परिस्थितीत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. 


 वसई मंडलात वसई आणि विरार हे दोन विभाग आहेत. वसई विभागात सर्व वर्गवारीचे मिळून जवळपास ३ लाख ६८ हजार तर विरार विभागात ५ लाख ६२ हजार वीज ग्राहक आहेत. वसई विभागातील ३३ हजार तर विरार विभागातील ४७ हजार ग्राहकांनी मार्च २०२० नंतर गेल्या वर्षभरात वीजबिलाचा एक रुपयाही भरलेला नव्हता. या ग्राहकांकडे अनुक्रमे ३६ व ४२ कोटी असे एकूण ७८ कोटी रुपयांची थकबाकी होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सातत्याने पाठपुरावा व विनंती केल्यानंतर यातील २८ कोटी रुपयांची आतापर्यंत वसुली होऊ शकली. उर्वरित थकबाकीपैकी २७ कोटी रुपये वसई विभागातील २५ हजार ३०० ग्राहकांकडे तर २३ कोटी विरार विभागातील २८ हजार ६०० ग्राहकांकडे थकीत आहेत. 


अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी चोरून अथवा इतरांकडून वीजपुरवठा सुरू ठेवल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहक व अनधिकृतपणे वीज देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष पथकांची करडी नजर या ग्राहकांवर राहणार आहे. 
वसई मंडळात गेल्या वर्षभरातील १२२ कोटी व त्यापूर्वीचे ७८ कोटी असे एकूण २०० कोटी रुपयांचे थकीत वीजबिल वसूल करण्याचे आव्हान आहे. वसुलीत मदतीसाठी कल्याण परिमंडल कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या थकबाकीचे ओझे घेऊनच महावितरण कर्मचाऱ्यांना मार्च अखेरच्या वसुलीला सामोरे जावे लागणार आहे. 

Web Title: MSEDCL's arrears over Rs 200 crore in Vasai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.