पहिल्याच पावसात चिखल

By admin | Published: June 10, 2017 01:01 AM2017-06-10T01:01:02+5:302017-06-10T01:01:02+5:30

पावसाळ्याआधी वेळीच खड्डे व रस्त्यांची कामे महापालिकेने पूर्ण न केल्याने पहिल्याच पावसात शहरात जागोजागी चिखल

Mud in the first rain | पहिल्याच पावसात चिखल

पहिल्याच पावसात चिखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : पावसाळ्याआधी वेळीच खड्डे व रस्त्यांची कामे महापालिकेने पूर्ण न केल्याने पहिल्याच पावसात शहरात जागोजागी चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. संपूर्ण पावसाळा खड्डे-चिखलाच्या रस्त्यांची डोकेदुखी नागरिकांना सोसावी लागणार आहे.
पावसाळ्यापूर्वीच डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याचे सरकारचे निर्देश आहेत. कारण, पावसाळ्याच्या तोंडावर खड्डे भरणे व डांबरीकरणाची कामे केली, तर ती टिकत नाहीत. त्यामुळे एकच काम पुन्हा काढावे लागते. त्यामुळे लाखोंचा भुर्दंड बसतो. या सर्व गोष्टींची कल्पना असतानाही मीरा-भार्इंदर महापालिकेने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.
पालिकेच्या नियोजनशून्य व भोंगळ कारभारामुळे खोदकाम, रस्ते तसेच पॅचवर्क आदींची कामे वेळेत पूर्णच झाली नाहीत. स्वत: आयुक्तांनी बैठक घेऊन १५ मेपर्यंत खोदकामाची कामे पूर्ण करा आणि ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे संपवा, असे निर्देश दिले होते. परंतु, आयुक्तांचे आदेश म्हणजे केवळ तोंडाच्या वाफा ठरल्या. कारण, १५ मेनंतरही त्यांच्या डोळ्यांदेखत शहरात सर्रास खोदकामे सुरूच होती. अगदी पाऊस पडेपर्यंत डांबरी व काँक्रिटीकरणाची कामे महापालिकेनेच चालवली.
शहरातील खोदकामे, डांबरीकरण, पालिकेचा भोंगळ कारभार व यामुळे होणाऱ्या परिणामांचे वृत्त ‘लोकमत’ने ४ जून रोजी दिले होते. आयुक्तांनी त्याची दखल घेत सर्वच अधिकाऱ्यांना शहरातील कामांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. नियम डावलून सर्रास कामे काढून ठेवल्याने आधीच सर्वत्र खड्डे, रखडलेले रस्ते व दगडमातीने भरलेले खड्डे असे चित्र होते. पालिका निवडणूक असल्याने वाटेल तशी कामे केली.

Web Title: Mud in the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.