मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला, अवजड वाहनांची चाके अडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 04:09 PM2024-06-09T16:09:00+5:302024-06-09T16:10:50+5:30
खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
मंगेश कराळे
पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला असून वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील जे के टायर शो रूम जवळ सूर्या पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने हा महामार्ग खचला आहे. माती खचण्याची ही गेल्या १० दिवसातील दुसरी घटना आहे. अवजड वाहनांची चाके रस्त्यात अडकल्याने मुंबई अहमदाबाद महामार्ग ठप्प झाला होता. सध्या खचलेला रस्ता दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.
खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. महामार्ग पोलिसांकडून वाहन बाजूला काडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. दहा दिवसा पूर्वी घोडबंदर जवळ मीरा भाईंदरला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असताना माती धस्ली आणि त्यात जेसीबीसह त्याचा चालक माती खाली गाडला गेला होता. त्याचे पुढे काय झाले ते अजून समजले नाही. त्यातच मुंबई अहमदाबाद महामार्गावर सीमान्त काँक्रिटीकरण सुरु असल्याने अगोदरच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असताना आता रस्ता खचल्याने त्याचा हि त्रास सहन करावा लागत आहे. येत्या पावसाळ्यात महामार्गावरील सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने रस्त्यावर खाद्याचे साम्राज्य असणार असल्याचे चित्र आता पासूनच दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्यात या महामार्गावरून प्रवास करताना सांभाळून करावा लागणार आहे.