त्यांची सुरक्षा मुंबई मनपाने पाहावी- वसई मनपा आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:31 PM2019-08-08T23:31:46+5:302019-08-08T23:32:10+5:30
तानसा - वैतरणा धरणाचे पाणी नागरिकांच्या घरात
वसई : मुंबई महापालिकेची तानसा, वैतरणा नदीवर असणारी धरणे यंदा भरली असून त्याचे पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये आले आहे. या भागातील गावे आणि येथील काही घरे वसई - विरार महापालिकेच्या हद्दीत असून तानसा, वैतरणा या दोन्ही धरणांच्या पाण्यामुळे येथील गावातील घरांमध्ये पाणी साचले होते. यामुळे येथील नागरिकांच्या वस्तीला धोका असून भविष्यात हा धोका उद्भवू नये, यासाठी येथे मजबूत बंधारा बांधावा अशी मागणी आम्ही मुंबई महानगरपालिकेकडे करणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.
वसईत सलग दुसऱ्या वर्षी आणि यंदा तीन वेळा आलेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निरी तसेच आयआयटी, मुंबई या तांत्रिक संस्थाच्या तज्ज्ञांनी पुन्हा एकदा वसई-विरारचा दौरा केला. धरणाच्या पाण्यामुळे घरात आलेले पाणी देखील निरी आणि आयआयटीच्या टीमला यावेळी प्रत्यक्ष पाहता आले. या टीमने वसई विरार शहरातील सर्व सखल भागांत जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. त्यानुसार आता या संस्थांमार्फत शहरातील सर्वेक्षण पर्जन्यमान आणि सद्य स्थितीतील ड्रेन मॅप तयार करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे निरीने सांगितले आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी वसई - विरारमध्ये अतिवृष्टी झाली होती. तेव्हासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी महापालिकेने सत्यशोधन समिती देखील स्थापन केली. यात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या तांत्रिक शासनमान्य संस्थांचा समावेश होता.
एकूणच या संपूर्ण अभ्यास समितीच्या कामासाठी पालिकेने या संस्थेला १२ कोटी रुपये शुल्क म्हणून दिले आहेत. मात्र, यंदा देखील अशाच पूरस्थितीला वसईकरांना तोंड द्यावे लागले. एकदाच नाही तर तीन वेळा ही परिस्थिती निर्माण झाल्याने पालिकेने पुन्हा या संस्थांना नेमकी काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी भर पावसात पाचारण केले.
त्यानुसार निरी व आयआयटी, मुंबई या दोन्ही संस्थांचे अधिकारी दोनच दिवसांपूर्वी पुन्हा दुसºयादा वसईत दाखल झाले होते. यावेळी महापालिकेचे सर्व विभागांचे अधिकारी- कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते.
यंदा साचलेल्या पाण्याचा निचरा लवकर - पालिकेचा दावा
पावसाळ्यापूर्वी आयआयटी आणि नीरी यांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे काम करण्यात आले होते. त्यामुळे या साचलेल्या पाण्याचा निचरा गतवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर झाला, असा दावा वसई - विरार महापालिकेने केला आहे. याप्रसंगी पालिका आयुक्त बळीराम पवार म्हणाले की, आयआयटी आणि निरी यांची टीम वसई विरार मध्ये येऊन गेली, त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना वसई-विरार हद्दीतील जेवढे सखल व धोकादायक भाग आहेत, ते सर्व निदर्शनास आणून दिले.
पावसातच घेतला निरीने आढावा
वसई विरार मध्ये शनिवारी, रविवारी व सोमवारी मुसळधार पाऊस सुरू होता त्यातच दोन दिवसांपूर्वी या पावसाच्या वेळीच विविध भागात भागात आणि साचलेल्या पाण्यात निरी व आयआयटी च्या अधिकारी वर्गानी सर्वेक्षण केले.
पाऊस सुरू असल्याने निरीला ही परिस्थिती प्रत्यक्ष पाहता आली. त्यानुसार पिम्पंग स्टेशन, होल्डिंग पॉइंट्स या सर्वांचा अहवाल निरी आता देणार आहे. तसेच, भविष्यात अन्य उपाय व दक्षता म्हणून करावयाची कामे यांचा देखील अहवाल निरी आयआयटी पालिकेला सादर करणार आहे.