पालिका आयुक्त घरची भांडी घासायला लावतात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:31 PM2020-06-11T23:31:44+5:302020-06-11T23:31:50+5:30
महिला कर्मचाऱ्याची तक्रार : वसई महापालिकेतील धक्कादायक प्रकार
विरार : वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. वेगवेगळ्या वादांमुळे चांगलेच चर्चेत असून आता त्यांच्याभोवती वादाचे आणखी एक नवीन वादळ घोंघावत आहे. पालिकेतील एका महिला चतुर्थ श्रेणी कर्मचाºयाने गंगाथरन यांच्याबद्दल थेट महापौरांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी आयुक्तांनी आपल्याला त्यांच्या सरकारी निवासस्थानी ड्युटी लावल्याचे आणि आपल्याकडून भांडी घासून घेण्यासारखी वैयक्तिक कामे करून घेतल्याचे नमूद केले आहे. याबाबत त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या महिलेने केली आहे.
योगिता जाधव या वसई-विरार महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांनी १ जून २०२० रोजी महापौरांना लिहिलेल्या पत्रात आयुक्तांविरोधात तक्रार केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, त्यांना आणि त्यांच्यासह आणखी दोन कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर ड्युटी लावली, मात्र या वेळी आयुक्तांनी आणि त्यांच्या पत्नीने या कर्मचाºयांकडून घरची कामे करून घेतली. ‘आयुक्तांनी मला भांडी घासायला लावली, आमच्याकडून लादी पुसून घेतली. एवढेच कशाला, मासेही साफ करायला लावले. आठ तास मला बसायलाही दिले नाही. उभे राहून राहून माझ्या तब्बेतीची दुखणी वाढली,’ असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. तसेच गंगाथरन यांच्या पत्नीनेही आपल्याला अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली, असाही आरोप त्यांनी केला आहे.
या कामानंतर जाधव यांना दुखणे सुरू झाल्याने त्यांना सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. सलग आठ तास उभे राहिल्यामुळे हे झाल्याचे तिथे त्यांना कळले. पण आयुक्तांनी याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यानंतर ही तक्रार आरोग्य अधिकारी विकास पाटील यांच्यापर्यंतही पोहोचवण्यात आली, मात्र त्यांनीही या तक्रारीची दखल घेण्यास नकार दिला.
जाधव यांच्या म्हणण्यानुसार आयुक्तांविरोधात ही तक्रार केल्यानंतर शिक्षा म्हणून त्यांची बदली कोरोनासाठी उभारलेल्या केंद्रात करण्यात आली. शैक्षणिक पात्रता असतानाही आपल्याला कोणत्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय स्वच्छतागृहाची सफाई, रुग्णांचे कपडे आणि चादरी धुणे अशी कामे करावी लागत आहेत. अशा वेळी आपल्याला कोरोनाची लागण झाली, तर याची जबाबदारी कोणाची, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
योगिता जाधव यांच्या आईदेखील पालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. आम्ही आयुक्तांची तक्रार केल्याने आता आम्हाला नोकरीतूनही काढून टाकतील, अशी भीती वाटते, असेही जाधव म्हणाल्या. जाधव यांना २०१६ मध्ये अनुकंपा तत्त्वावर वसई-विरार महापालिकेत नोकरी मिळाली होती. पदवीधर असलेल्या जाधव त्या आधी सर दिनशॉ माणेकजी पेटीट रुग्णालयात लिपिक पदावर कार्यरत होत्या. या तक्रारीमुळे वसई-विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. तसेच कर्मचाºयांच्या मनातही आयुक्तांबद्दल असंतोष आहे. यासंदर्भात संपर्क साधूनही आयुक्तांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
हा प्रश्न मी महासभेत घेणार होतो, मात्र आयुक्त महासभा घेण्यास परवानगी देत नसल्यामुळे आता हे प्रकरण आम्ही राज्य सरकारकडे नेणार असून आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत.
- प्रवीण शेट्टी, महापौर, वसई-विरार महानगरपालिका.