पालिका आयुक्तांचा जाता जाता ‘दे धक्का’!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:38 AM2020-01-08T01:38:21+5:302020-01-08T01:38:27+5:30
आयुक्त बी.जी. पवार यांनी जाता जाता आपल्या आस्थापना विभागाला आदेश देत कर्मचारी-अधिकारी वर्गाच्या अंतर्गत बदल्या करून सर्वांना ‘दे धक्का’ दिला असल्याची बाब समोर आली आहे.
वसई : वसई-विरार शहर महापालिकेच्या ऐच्छिक स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या आयुक्त बी. जी. पवार यांनी जाता जाता आपल्या आस्थापना विभागाला आदेश देत कर्मचारी-अधिकारी वर्गाच्या अंतर्गत बदल्या करून सर्वांना ‘दे धक्का’ दिला असल्याची बाब समोर आली आहे.
पालिकेचे आयुक्त बळीराम पवार ३१ डिसेंबरला स्वेच्छानिवृत्त झाले असून आता महापालिकेचा कारभार जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, पवारांनी जाता-जाता अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करून आपला दणका दिला आहे. यामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी परिस्थिती सध्या विविध प्रभागात चर्चिली जात आहे. गंभीर बाब म्हणजे पालिकेतील अनेक सहाय्यक आयुक्तांना पदावरून पायउतार करण्यात आले आहे, तर काहींना मानाच्या खुर्चीवर बढती देण्यात आली आहे. यामध्ये १० अधिकाऱ्यांचा समावेश असून यात मेधा वर्तक, प्रेमसिंह जाधव, राजेश घरत, मिलिंद पाटील, वसंत मुकणे, अंबादास सरवदे, दीपाली ठाकूर, विकास पाडवी, प्रशांत चौधरी आणि सुरेंद्र पाटील यांना बढती देण्यात आली आहे.
वरिष्ठ लिपिक मेधा वर्तक या प्रभाग समिती आयच्या प्रभारी लेखापाल होत्या. आता त्यांना या समितीच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त करण्यात आले आहे. उपअधीक्षक असलेले प्रेमसिंह जाधव अभिलेख कक्षाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त होते. त्यांना निवडणूक व जनगणना तसेच स्थायी समिती सभापती यांचे स्वीय सहाय्यक व प्रभारी सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरे उपअधीक्षक राजेश घरत यांना धानिव-पेल्हार समितीचे सहाय्यक आयुक्तपद देण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे वरिष्ठ निरीक्षक वसंत मुकणे यांना प्रभाग समिती ‘सी’चे सहाय्यक आयुक्त करण्यात आले आहे. तर वरिष्ठ लिपिक असलेले अंबादास सरवदे हे प्रभाग ‘सी’चे सहाय्यक आयुक्त होते. त्यांची नालासोपारा प्रभाग ‘ई’मध्ये उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. प्रभाग ‘एफ’च्या सहाय्यक आयुक्त दीपाली ठाकूर यांची ‘एच’ प्रभागात महिला आणि बालकल्याण विभागात बदली करण्यात आली आहे.
>लिपिक-सहाय्यक आयुक्त
लिपिक विकास पाडवी यांच्याकडे सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी होती. ती काढून त्यांना अतिक्रमण विभागात पाठवले आहे.
लिपिक प्रशांत चौधरी वालीवचे सहाय्यक आयुक्त होते. त्यांना आता मुख्यालयातील लेखा विभागात पाठवण्यात आले आहे.