नायलॉन मांजा वापरण्यास महापालिकेने केला प्रतिबंध
By धीरज परब | Published: January 12, 2024 06:50 PM2024-01-12T18:50:41+5:302024-01-12T18:51:43+5:30
नायलॉन मांजाचा वापर केल्यास कारवाईचा इशारा पालिकेने दिला आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने मकर संक्रांति निमित्त नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व पतंग उडवण्याकरिता वापरण्यास प्रतिबंध घातला आहे. नायलॉन मांजाचा वापर केल्यास कारवाईचा इशारा पालिकेने दिला आहे. मकर संक्राती निमित्त पतंग उडवले जातात. पतंग उडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक किंवा सिंथेटिक धाग्यांचा किंवा नायलॉन मांजा वापर करण्याची शक्यता असते. नायलॉन मांजामुळे पक्षी यांना इजा होते तसेच अनेक पक्षी जीव गमावतात. नायलॉन मांजामुळे केवळ पक्षीच नाही तर मनुष्य यांना सुद्धा धोकादायक असून नायलॉन मांजामुळे माणसांना देखील इजा होऊन अगदी जीव गमवावा लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळेच शासनाने देखील नायलॉन मांजा वर बंदी घातलेली आहे. शिवाय भारताच्या ऍनिमल वेल्फेअर बोर्डने सुद्धा याबाबत सूचना जारी केल्या आहेत.
त्यामुळे नागरिकांना पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा ऐवजी पर्यावरण पूरक पर्यायांचा अवलंब करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे . प्लास्टिक किया इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजाचा वापर टाळावा. घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणुकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी. वर्षभरात त्याची साठवणूक, हाताळणी व विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी.
पतंग उडवितांना केलेल्या मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होवून आग लागणे, उपकेंद्रे बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जिवीतहानी होणे, इ. बाबींचा विचार करता नायलॉन मांजाचा वापर करु नये. नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या पशु पक्षी यांना उपचाराकरिता भाईंदर पश्चिमेस उड्डाणपूल खाली "पशु पक्षी केंद्र उ येथे दाखल करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.