मनसेच्या राड्याविरोधात पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 08:38 PM2020-07-15T20:38:11+5:302020-07-15T20:38:41+5:30
पालिकेच्या वालीव कोविड सेंटरमध्ये रुग्णांना योग्य त्या सुविधा दिल्या जात नसल्याच्या मनसे कडे तक्रारी होत्या.
वसई - वालीव कोविड सेंटर मधील असुविधे बाबत प्रश्न उपस्थित करून वसई विरार महापालिकेच्या विरार मुख्यालयात मंगळवारी दुपारी राडा करून आयुक्तांना गलिच्छ शिवीगाळ व घोषणा, पोस्टरबाजी करणाऱ्या मनसे जिल्हाद्यक्ष व अन्य कार्यकर्त्यांवर कलम 353 अनव्ये म्हणजेच सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून बुधवारी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
पालिकेच्या वालीव कोविड सेंटरमध्ये रुग्णांना योग्य त्या सुविधा दिल्या जात नसल्याच्या मनसे कडे तक्रारी होत्या. या तक्रारींचा जाब विचारण्यासाठी मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह पालिका मुख्यालयात मंगळवारी राडा केला. यावेळी जाधव सहीत अन्य कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांना उद्देशून अश्लिल शिवीगाळ केली. याप्रकरणी विरार पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांविरोधात मंगळवारी उशिरा गुन्हा तर दाखल केला आहे. मात्र,आता पालिकेवर प्रशासक राजवट आहे सोबत ते आयुक्त ही आहेत त्यामुळे त्यांच्यावर झालेला हा शाब्दिक खाल्ला हा आम्हा कर्मचाऱ्यांवर देखील झालेला हल्ला असल्याची तीव्र भावना व्यक्त करून पालिकेतील सर्व प्रभाग समिती कार्यालयात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून तीव्र आंदोलन केले. परिणामी मनसेच्या या उर्मट जिल्हाध्यक्ष व अन्य कार्यकर्त्यांवर कलम 353 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.