महापालिका रुग्णालये शनिवारी बंद; मृताच्या आप्तांच्या धिंगाण्याचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 04:15 AM2017-11-12T04:15:50+5:302017-11-12T04:16:07+5:30
तुळींज रुग्णालयात मृत बालकांच्या नातेवाईकांनी हंगामा केल्याच्या निषेधार्थ वसई विरार महापालिकेच्या सर्व दवाखाने आणि रुग्णालयातील कामकाज शनिवारी एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल झाले होते.
वसई : तुळींज रुग्णालयात मृत बालकांच्या नातेवाईकांनी हंगामा केल्याच्या निषेधार्थ वसई विरार महापालिकेच्या सर्व दवाखाने आणि रुग्णालयातील कामकाज शनिवारी एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे या बंदची कल्पना आरोग्य सभापती अथवा समितीला देण्यात आली नसल्याचे उजेडात आले आहे.
महापालिकेच्या तुळींज येथील रुग्णालयात शुक्रवारी तेजस्विनी पांडे (२) या दोन वर्षाच्या बालिकेला तपासणीसाठी पालक घेऊ़न आले होते. रुग्णालयातील बालरोग तज्ञांनी रुग्णाचा एक्सरे, तपासणी व औषधोपचार करून रुग्णाला घरी पाठवून दिले होते. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास पालकांनी तेजस्विनीला अपघात विभागात आणले होते. त्यावेळी डॉक्टरांनी तिला रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित केले होते. पण, संतापलेल्या वडिलांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाºयांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश चौहान यांनी सांगितले. अचानक काम बंद आंदोलन पुकारले गेल्याने सर्वसामान्य रुग्णांचे मात्र हाल झाले होते.
कर्मचारी असुरक्षित ?
याआधीही अशा दोन घटना घडल्याने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाºयांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि शुक्रवारी घडलेल्या प्रकाराचा निषेध म्हणून महापालिकेची रुग्णालये, आरोग्य केंद्रे ओपीडी बंद होते.