पालिका क्रिडा संकुलात उपहारगृहाऐवजी महागडे हॉटेल; ठेकेदारावर कारवाईस टाळाटाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 09:36 PM2018-10-25T21:36:38+5:302018-10-25T21:40:55+5:30
या प्रकरणी मनसेचे उपशहर अध्यक्ष हेमंत सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी १४ आॅगस्ट रोजी पालिका उपायुक्त दिपक पुजारी यांना भेटून तक्रार केली होती. त्या अनुषंगाने २३ आॅगस्ट रोजी पालिकेने ठेकेदारास पत्र पाठवून खुलासा मागवला होता.
मीरारोड - भार्इंदर पूर्व येथील महापालिकेच्या स्व. गोपीनाथ मुंडे क्रीडासंकुलातील अंतर्गत उपहारगृहाचे चक्क दर्शनी भागातच फलक लाऊन रेस्टॉरंट व घरपोच सेवा चालवणारया ठेकेदारावर राजकिय दबावा मुळे कारवाई करण्यास पालिका प्रशासनाची टाळाटाळ सुरु असल्याचा आरोप मनसेने केलाय. पालिकेच्या कारणे दाखवा नोटीसला ठेकेदाराने उर्मट उत्तर दिल्यावर पालिकेने पुन्हा नोटीस बजावली होती. पण त्याला देखील १५ दिवस उलटले आहेत.
मीरा भार्इंदर महापालिकेने त्यांचे एकमेव क्रिडा संकुल चॅम्पीयन क्लब या खाजगी संस्थेला चालवण्यास दिले आहे. या संस्थेला केवळ क्रीडासंकुला साठी उपहारगृह चालवण्याची परवानगी असताना ठेकेदार संस्थेने प्रत्यक्षात मात्र स्वादम या नावाने आलिशान रेस्टोरेंट सुरु केले. त्याचा भला मोठा फलक दर्शनी भागात लावत खाद्य - पेयांची घरपोच सेवा सुध्दा सुरु केली आहे. क्रिडा संकुलात येणारयांसाठी हे उपहारगृह असताना बाहेरच्या लोकांनाही त्यात प्रवेश दिला जातोय. ठेकेदाराने तसा फलकच लावला आहे. हॉटेलमध्ये मिळणारे तंदुरी, मोगलाई आदी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ दिले जात आहेत. त्याचे दर सुद्धा जास्त असून रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालवले जात आहे. या प्रकरणी मनसेचे उपशहर अध्यक्ष हेमंत सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी १४ आॅगस्ट रोजी पालिका उपायुक्त दिपक पुजारी यांना भेटून तक्रार केली होती. त्या अनुषंगाने २३ आॅगस्ट रोजी पालिकेने ठेकेदारास पत्र पाठवून खुलासा मागवला होता.
३० आॅगस्ट रोजीच्या पत्रान्वये ठेकेदाराने खुलासा देताना जाहिरात फलक रेस्टॉरंट किंवा कॅन्टीन असेल म्हणून तेथील अन्नाचा गुणधर्म बदलतो असे नाही आणि खाद्य पदार्थांचे दर ठरवण्याचे अधिकारी पालिकेने ठेकेदारास दिले असल्याचे म्हटले होते. त्यानंतर ५ आॅक्टोबर रोजीच्या पत्रान्वये उपायुक्त पुजारी यांनी ठेकेदारास पत्र देऊन खुलासा अमान्य करतानाच तक्रारी नुसार अटीशीर्तचा भंग केल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे रेस्टोरेंट त्वरीत बंद करुन सामान्य लोकांना परवडेल असे उपहारगृह सुरु करावे. अन्यथा करारनाम्यातील अटीशर्तीप्रमााणे कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. सत्ताधारी पक्षाचा ठेकेदार असल्याने तो मुजोर असुन सर्रास मनमानी दर आकारुन हॉटेल चालवत आहे. राजकीय दबावामुळेच पालिका प्रशासन कागदीघोडे नाचवत असल्याचा आरोप मनसेचे हेमंत सावंत यांनी केला आहे.