वसई डीवायएसपी आॅफिसात जाळून घेतलेला मृत्युमुखी, चौकशी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 04:18 AM2017-11-12T04:18:26+5:302017-11-12T04:18:38+5:30
शुक्रवारी रात्री येथील डीवायएसपी कार्यालयात स्वत:ला पेटवून घेऊन डीवायएसपींना मिठी मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करणा-या तरुणाचा उपचारादरम्यान मुंबईतील रुग्णालयात शनिवारी पहाटे मृत्यू झाला. याप्रकरणाची चौकशी सुरु असून अहवालानंतर कारवाई केली जाणार आहे.
वसई : शुक्रवारी रात्री येथील डीवायएसपी कार्यालयात स्वत:ला पेटवून घेऊन डीवायएसपींना मिठी मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करणा-या तरुणाचा उपचारादरम्यान मुंबईतील रुग्णालयात शनिवारी पहाटे मृत्यू झाला. याप्रकरणाची चौकशी सुरु असून अहवालानंतर कारवाई केली जाणार आहे.
विकास विनयकांत झा (२३, रा. फुलपाडा, विरार पूर्व) असे या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास विकासने या कार्यालयाबाहेर स्वत:ला पेटवून घेतले. बाहेर चाललेला आरडाओरड ऐकून डीवायएसपी विश्वास वळवी कार्यालयाबाहेर आले असता जळलेल्या अवस्थेत त्याने त्यांनाच मिठी मारण्याचा प्रयत्न केला. सावध असलेल्या वळवी यांनी त्याला दूर ढकलून स्वत:चा बचाव केला. त्यानंतर पोलीस कर्मचाºयांनी त्याच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली.
जखमी अवस्थेत त्याला वसईतील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. मात्र, त्याची प्रकृत्ती चिंताजनक असल्याने रात्रीच मुंबईतील कस्तुरबा हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना विकासचा पहाटे मृत्यू झाला. दोनच दिवसांपूर्वी विकासविरोधात विरार पोलीस ठाण्यात मिथिलेश झा या महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. विरार पोलीस ठाण्यात विकासविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, विनयभंग, जबरी चोरी, जबरी दुखापत, घरात घुसून मालमत्तेचे नुकसान करणे, मालमत्तेचा अपहार असे विविध सात गुन्हे दाखल आहेत. तर त्याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव वसईच्या प्रांताधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे. तो स्वत:ला निर्दोष समजत होता. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा त्याचा दावा होता. त्यामुळे नैराश्य आल्यानेच त्याने आत्महत्या केली असावी असे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
दरम्यान, स्वत:ला पेटवून दिल्यानंतर डीवायएसपी विश्वास वळवी यांना मिठी मारून त्यांनाही मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी विरारचे डीवायएसपी जयंत बजबळे यांची विशेष चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सिंगे यांनी दिली आहे. याप्रकरणात कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कृती करु नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
डीवायएसपींचा पहिलाच दिवस...
वसईच्या डीवायएसपी पदाचा विश्वास वळवी यांनी शुक्रवारी सकाळी कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर संध्याकाळी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी वरिष्ठ अधिकाºयांची वसई डीवायएसपी कार्यालयात आढावा बैठक घेतली होती.
संध्याकाळी साडेसहा वाजता सिंगे बैठक आटोपून गेले होते. अपर पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन आणि डीवायएसपी विश्वास वळवी हे कार्यालयात काम करीत असतांना रात्री आठच्या सुमारास ही भयानक अशी घटना घडली. त्यामुळे वळवी यांना मानसिक धक्का बसला आहे.