चाेरीच्या उद्देशाने केली सुरक्षारक्षकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 12:59 AM2021-03-03T00:59:28+5:302021-03-03T00:59:43+5:30

तिघे अटकेत : अल्पवयीन मुलांचा समावेश

Murder of a security guard with intent to steal | चाेरीच्या उद्देशाने केली सुरक्षारक्षकाची हत्या

चाेरीच्या उद्देशाने केली सुरक्षारक्षकाची हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नालासोपारा : सोमवारी पहाटे संख्येश्वरनगरमध्ये राहणाऱ्या सुरक्षारक्षकाचा कामावर जाताना चाकूने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली होती. या हत्येप्रकरणी तुळिंज पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हत्येपूर्वी त्यांनी दाेघांना लुटले असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, तुळिंज पाेलिसांची गस्त असती तर या तिन्ही घटनाच घडल्या नसत्या आणि सुरक्षारक्षकाचा जीवही वाचला असता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.


ओम साई चाळीत राहणाऱ्या कैलास देवेंद्र पाठक (४८) यांची कामावर जात असताना घराजवळच तीन आरोपींनी पैसे किंवा मोबाइलसाठी हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या तीन आरोपींपैकी दोन आरोपी हे १६ वर्षांचे आहेत. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी हितेश मंगेश भोसले (१८) याला अटक केले आहे. या तिन्ही आरोपींनी या हत्येपूर्वी पहाटे ३ ते पावणे चार वाजण्याच्या दरम्यान जबरी चोरीचे दोन गुन्हे केल्याचेही पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून पोलिसांनी चाकू जप्त केला आहे. निळेगावात राहणारा रिक्षाचालक अमोल जयराम इंगळे (३२) याच्यावर साडेतीन वाजण्याच्या सुमारास नवनीत हॉस्पिटलजवळ चाकूचा धाक दाखवून छाती व पोटावर हल्ला केला.  त्यांनी अमोलच्या खिशातील ५०० रुपये काढून मोबाइल खेचून पळून गेले. तर दुसऱ्या घटनेत ४ वाजण्याच्या सुमारास संख्येश्वरनगरमध्येच टॅक्सीचालक हसमतअली पठाण (६८) यांनाही याच तिघांनी हातात चाकू घेऊन मनसे ऑफिसच्या जवळ चाकू मारण्याचा धाक दाखवून ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना जखमी करून पैसे आणि मोबाइल हिसकावून पळून गेले. तिसऱ्या घटनेत सुरक्षारक्षकाने पैसे व मोबाइल देण्यास नकार दिल्यानंतर त्याची हत्या केल्याचा  संशय आहे.


हत्येप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना गजाआड केले आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना भिवंडी बालसुधारगृहात पाठवले आहे. एका आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी 
सुनावली आहे. 
- राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळिंज पोलीस ठाणे

Web Title: Murder of a security guard with intent to steal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.