घटस्फोटासाठी पोटगी मागणा-या पत्नीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 06:10 AM2017-09-13T06:10:12+5:302017-09-13T06:10:12+5:30
पोटगी मागणा-या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी विरार पोलिसांनी पतीसह सात जणांना अटक केली आहे. त्यात एका महिलेचा सहभाग आहे.
वसई : पोटगी मागणा-या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी विरार पोलिसांनी पतीसह सात जणांना अटक केली आहे. त्यात एका महिलेचा सहभाग आहे.
विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजोण येथील बुधरपाडा अंगणवाडीजवळ रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी तपास करण्यासाठी विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी एक पथक तयार केले होते.
मयत महिलेचे नाव रमाबाई उर्फ निर्मला नामदेव पाटील (५३) असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस चौकशीत नामदेवने हत्या केल्याची कबुली दिली. नामदेव आणि रमाबाई यांच्यात सतत वाद होत असल्याने ती त्याच्यापासून विभक्त रहात होती. घटस्फोटासाठी रमाबाई नामदेवकडे पोटगी आणि मालमत्तेत हिस्सा मागत होती. त्यावरून नामदेव संतापला होता. संतापलेल्या नामदेवने तिचा काटा काढण्यासाठी आपल्या साथिदारांना अडीच लाखाची सुपारी दिली होती. त्यानंतर सात जणांनी मिळून रमाबाईची हत्या केली होती.
याहत्येप्रकरणी विरार पोलिसांनी नामदेवसह पांडुरंग जीवन कदम, चंद्रकांत गणपत पडवळे, लक्ष्मण गोविंद कोबाड, वंदना लक्ष्मण पवार, लक्ष्मण जीवन पवार, राकेश लक्ष्मण पवार यांना अटक केली आहे.