मनोरमध्ये गटारसफाईला मुहूर्त
By Admin | Published: June 29, 2017 02:39 AM2017-06-29T02:39:29+5:302017-06-29T02:39:29+5:30
पावसामुळे गटारी तुंबून घाण पाणी रस्त्यावर येताच ग्रामपंचायतला एकदाची जाग आली व तिने भर पावसात गटारींच्या सफाईला प्रारंभ केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मनोर : पावसामुळे गटारी तुंबून घाण पाणी रस्त्यावर येताच ग्रामपंचायतला एकदाची जाग आली व तिने भर पावसात गटारींच्या सफाईला प्रारंभ केला. उन्हाळ्यात साफसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांना रस्त्यावर वर साचलेल्या घाण पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
मनोर-पालघर रस्त्यावर दोन्ही बाजूला भरवस्तीत गटारे आहेत पावसाच्या आधी पंधरा दिवस त्यांची साफसफाई केली जाते. मात्र यंदा ग्रामपंचायतला त्याचा विसर पडला त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे त्या तुडुंब भरल्याने घाण पाणी बाजारपेठ, बसस्थानक, मार्केट या ठिकाणी रस्त्यावरुन वाहू लागल्याने त्यातून ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना व वाहनधारकांना मार्ग काढावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या लगत गटारी केल्या आहेत मात्र त्यांच्याकडून त्यांच्या सफाईकडे ही दुर्लक्ष होते आहे.
सरपंच जागृती हेमाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की पावसाळ््याच्या अगोदर दोन तीन वेळा गटारी साफ केल्या होत्या. परंतु नागरिक त्या गटारींमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, घाण टाकतात त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आता भर पावसात पुन्हा मजूर लावून सफाई सुरू केली आहे. एका परिने त्यांनी याचे खापर रहिवाशांवर फोडले आहे.