वाड्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीचे वाड्यात वाजू लागले पडघम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 05:40 AM2017-09-14T05:40:03+5:302017-09-14T05:40:54+5:30
ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन सुमारे पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे लवकरच तिच्या निवडणुका घोषीत होण्याची चिन्हे असल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
- वसंत भोईर
वाडा : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन सुमारे पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे लवकरच तिच्या निवडणुका घोषीत होण्याची चिन्हे असल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
ग्रामपंचायत असतांना सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजप युतीमध्ये सध्या बेबनाव असून हे दोन्ही पक्ष स्वबळाच्ांीच भाषा करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्यावेळी कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागलेल्या भारतीय जनता पार्टीचे गेल्या काही निवडणुकांतील मताधिक्य वाढल्याने ताकद वाढली आहे. त्यातच पंचायत समितीपासून केंद्रसरकारपर्यंत भाजपचीच सत्ता असल्याने आता भाजपकडे कार्यकर्त्यांचा भरणा वाढला आहे.
नगरपंचायत निवडणुकीत अनुसूचित जमातीचे आरक्षण कमी झाल्याने इतर मागासवर्ग व खुल्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे अन्य समाजातील कार्यकर्त्यांना संधी वाढल्याने सर्वच राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. शिवसेनेचे वाडा शहरावर आजवर कायम वर्चस्व सिध्द झाले आहे. मात्र यावेळी भाजपने जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करत आपला विस्तार केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत काळातील शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला नगरपंचायत निवडणुकीत उपयोगाचा नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष सध्यातरी स्वबळाची भाषा करताना दिसत आहेत. तसेच ग्रामपंचायतीत महत्वाची भूमिका बजावणाºया बहुजन विकास आघाडीनेही काही जागांवर आपले उमेदवार जाहीर करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही निवडणूकीच्या मोर्चेबांधणीला लागली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी गणेशोत्सवाचें निमित्त साधून आपापल्या प्रभागात निवडक मतदारांच्या भेटी घेण्यावर भर दिल्याने नगरपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याचे दिसत आहे.
युती, आघाडीत बिघाडी
शिवसेना आणि भाजपने जागानिहाय मोर्चेबांधणी केली आहे. राष्ट्रवादीने ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून कॉंग्रेससोबत आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्येदेखील इच्छुक वाढले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षात जागा वाटपावरून बिनसण्याची चिन्हे आहेत.