नायगांव पोलिसांनी लाखोंचे ५५ मोबाईल केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2025 15:45 IST2025-02-11T15:44:51+5:302025-02-11T15:45:22+5:30
नागरिकांचे हरविलेले तब्बल ५५ मोबाईल नागरिकांना परत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली आहे.

नायगांव पोलिसांनी लाखोंचे ५५ मोबाईल केले परत
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- मोबाईल हा मानवाचा अभिवाज्य भाग बनला आहे. एकदा मोबाईल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशाच सोडून दिली जाते. एवढ्या प्रचंड लोकसंख्येत पोलिस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात. पण तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अनेकदा मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. ही शक्यता नायगांव पोलिसांनी खोडून काढली आहे. नागरिकांचे हरविलेले तब्बल ५५ मोबाईल नागरिकांना परत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली आहे.
नायगांव पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात दाट वस्ती असून आठवडी बाजार, रेल्वे स्टेशन परिसरातून गहाळ झालेल्या मोबाईल बाबत नायगांव पोलिसांना नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार नायगांवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या या मोबाईलचा तपास घेऊन ते शोधून काढले. नायगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या हस्ते सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या मूळ मालकांना परत केले. हरवलेले मोबाईल फोन मिळण्याची आशा नसता नाही पोलिसांनी ते शोधून त्यांच्या मालकांना पोचून एक अनोखी भेट दिल्याने मोबाईल फोन मालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. मोबाईल परत मिळाल्यानंतर लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहे.
नायगांव पोलिसांनी ९ लाख ४५ हजार रुपयांचे ५५ मोबाईल शोधून काढले असून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुले - श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे, नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि गणेश केकान, रोशन देवरे, पोलीस अंमलदार शेखर पवार, सचिन ओलेकर, सचिन मोहिते, सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, पांडुरंग महाले आणि अमोल बरडे यांनी अथक मेहनत करून मोबाईलचा शोध लावला आहे.