Nalasopara: १५० गुंतवणूकदारांची ३० कोटी रुपयांची आर्थिक फसवणुक करणाऱ्या आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 07:11 PM2023-11-04T19:11:03+5:302023-11-04T19:11:18+5:30
Crime News: विविध गृहनिर्माण कंपन्यांची स्थापना करून त्याद्वारे १५० गुंतवणूकदारांची ३० कोटी रुपयांची आर्थिक फसवणुक करणाऱ्या आरोपीला कर्नाटक राज्यातून गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.
- मंगेश कराळे
नालासोपारा - विविध गृहनिर्माण कंपन्यांची स्थापना करून त्याद्वारे १५० गुंतवणूकदारांची ३० कोटी रुपयांची आर्थिक फसवणुक करणाऱ्या आरोपीला कर्नाटक राज्यातून गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.
सन २०११ ते ४ मे २०१८ रोजी दरम्यान मे. मंदार हौसिंग प्रायव्हेट लिमीटेड या बांधकाम कंपनीचे राजु सुलीरे, अविनाश ढोले, विपुल बी पाटील, अल्लाऊद्दीन शेख, युसुफ कोटवाला आणी इतर यांनी आपसात संगणमत करुन तसेच फौजदारीपात्र कट रचुन प्रथम गरजू गुंतवणुकदार, ग्राहकांना आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी घरे सवलतीच्या दरात देण्याचे खोटे अमिष दाखवले. त्यानंतर गुंतवणुकदार, ग्राहकांना त्यांनी आर्थिक गुंतवणूक केलेल्या आश्वाषित सदनिकांचा ताबा विहीत वेळेत देत असल्याचे सांगुन न दिल्यास व्याजासह गुंतवणुकीची, मुद्दलाची रक्कम परत करण्याची हमी दिली. त्यानंतर आरोपी यांनी गुंतवणुकदार, ग्राहकांच्या ठेवी स्विकारुन त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सदनिकांच्या नोंदणीकृत सेल्स ऍग्रीमेंट करुन बनावट व खोटया दस्तएैवजाच्या आधारे एकच सदनिका अनेक ग्राहकांना विक्री करुन फसवणुक केली. त्याबाबत अर्नाळा पोलीस ठाण्यात विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता.
पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासावर असलेल्या गुन्हयातील पाहिजे, फरारी आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याबाबत वरिष्ठांकडुन सुचना देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने आरोपी राजु सिध्दय्या सुलीरे याचा शोध घेणे करीता गुन्हे शाखेच्या युनिट तीनने वेगवेगळे पथक तयार करुन आरोपीचा तांत्रीक विश्लेषण व माहिती मिळवुन राजु सिध्दय्या सुलीरे (५४) याला कर्नाटक राज्यातील बंगलुरु येथुन ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे प्राथमिक तपास केल्यावर त्याने विविध गृह निर्माण कंपन्यांची स्थापना करुन त्याव्दारे सुमारे १५० गुंतवणूकदारांची ३० कोटी रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याने निष्पन्न झाले. आरोपीपा पुढील कारवाईसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. आरोपीत ९ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजुर आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, मसुब सागर सोनावणे, गणेश यादव आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.