Nalasopara: त्यांचा मृत्यू हा मारहाण व ढकल्यामुळेच, रिजाय यांच्या हत्येच्या गुन्ह्याचा अखेर उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 06:48 PM2023-08-26T18:48:03+5:302023-08-26T18:48:46+5:30
Crime News: धानिवबाग येथे राहणारे रिजाय अली मुन्सी राजा (५५) यांचा मृत्यू हा मारहाण व नाल्यात ढकलल्याने डोक्याला मार लागल्यामुळे झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी फक्त एकाच आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला
- मंगेश कराळे
नालासोपारा - धानिवबाग येथे राहणारे रिजाय अली मुन्सी राजा (५५) यांचा मृत्यू हा मारहाण व नाल्यात ढकलल्याने डोक्याला मार लागल्यामुळे झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी फक्त एकाच आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा पुढील तपासासाठी पेल्हार पोलिसांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
नालासोपाऱ्याच्या धानिवबाग येथील परशुराम चाळीत राहणारा रिजाय अली मुन्सी राजा (५५) यांची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची फिर्याद मृत रियाजची बहिण नुरजहा खान हिने गुरुवारी पेल्हार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर वसईत खळबळ माजली होती. पोलिसांनी त्या तक्रारीवरून पत्नी, तिचा प्रियकर व इतर सात ते आठ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखा तीन, पेल्हार आणि तुळींज पोलिसांनी या गुन्ह्याचा वेगाने तपास सुरू केला. यातील काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करत गुन्ह्याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी घटना घडलेले ठिकाण शोधून त्याठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज मिळवल्याने या गुन्ह्याचा गुंता सोडविण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. गुन्हे शाखेने त्यांच्या ताब्यातील लोकांना तपासासाठी व सीसीटीव्ही फुटेज पेल्हार पोलिसांच्या स्वाधिन केले. पेल्हार पोलिसांनी सर्वांचे जाबजवाब, सीसीटीव्ही फुटेज व एका १० वर्षाचा साक्षीदार मुलाच्या महितीनंतर आरोपी जितेंद्रने केलेल्या मारहाणीमूळे व त्याच्या ढकल्याने रिजाय यांचा मृत्यू झाला आहे.
नेमकी काय होती घटना
रिजाय अली मुन्सी राजा (५५) हे अनुज, विनीत, जितेंद्र, टेलर व अन्य ओळखीच्या लोकांसोबत २१ ऑगस्टला कळंब समुद्रकिनार्यावर फिरण्यासाठी गेले होते. येताना वाटेत नाळा गावातील परिसरात टेंपोत रिजाय आणि जितेंद्र या दोघांचे आपसात भांडण झाले. जितेंद्रने रियाज यांना टेंपोतून उतरून मारहाण केली व ढकलले. रियाज यांना ढकल्याने नाल्यात पडले व डोक्यात मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार व इतर जणांच्या जबानीनंतर मारहाण व ढकलल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पंचनामा, गुन्ह्याचे इतर कागदपत्रे व घटनास्थळ नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तपास व चौकशीसाठी गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
- वसंत लब्दे
(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)