नालासोपारा बोगस म्हणून कुविख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:11 PM2019-07-12T23:11:27+5:302019-07-12T23:11:39+5:30
नव्याने प्राप्त झाली कलंकित ओळख : ब्लॅकमेल करून पैसे कमविण्याचा धंदा सुरु
नालासोपारा : वसई तालुक्यातील आणि सातासमुद्रापलिकडे गाजलेले शहर म्हणजे ‘नालासोपारा’ पण त्याला आता त्याची ‘बोगस’ या नावाने कुप्रसिद्धी होते आहे. नालासोपारा शहरात बोगस नावाने भरपूर काही कामकाज होत आहे. त्यातच बोगस डॉक्टर, बोगस पत्रकार, बोगस रिक्षा, बोगस शाळा, बोगस बिल्डर, बोगस संस्था, बोगस मेडिकल, बोगस मानवाधिकार संघटना, बोगस सीसी, जागेची बोगस कागदपत्रे, बोगस रेशनकार्ड, बोगस आधारकार्ड, बोगस इलेक्शन कार्ड अशा अनेक बोगस नावाने नालासोपारा शहराला ग्रासले आहे.
नालासोपारा शहरात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे. वसई पंचायत समितीने नालासोपारामधील बोगस शाळांची यादी दरवर्षी तयार करतात. पण ती यादी कमी होण्याऐवजी दरवर्षी वाढते. नालासोपारामध्ये वाढत चाललेली लोकसंख्या पाहता बनावट कागदपत्रे बनवून बोगस रिक्षांचा धंदा तर तेजीत सुरु असून वाहतूक विभाग यांच्यावर कारवाई करण्याऐवजी बिनधास्त डोळे बंद करून असल्याचे दिसत आहे. वसई विरार मनपाचा आरोग्य विभाग बोगस डॉक्टरची यादी तयार करतात पण या बोगस डॉक्टरांवरील कारवाईचे काय? नालासोपारा शहरातील दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये बोगस सीसी आणि जागेच्या बाबतीतील बोगस पत्र बनवल्याचे गुन्हे दाखल झालेत पण हे प्रकारही आता वाढतच आहेत.
बोगस कागदपत्रे बनवून त्याआधारे बोगस रेशनकार्ड, आधारकार्ड, इलेक्शन कार्ड बिनधास्त बनवले गेल्याचे दिसून येत आहे. पण तहसील प्रशासन याकडे का लक्ष घालत नाही? बोगस बनवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई का करत नाही. हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. नालासोपाºयात बनावट कागदपत्रांच्या आधारे काही इमारतीमधील घरांना बँकेतील काही अधिकारी बिल्डर आणि ग्राहकांकडून काही आर्थिक साटेलोटे करून बिनधास्त लोन पास केले आहे. पण ज्यांच्याकडे खरी कागदपत्रे आहेत त्यांचे लोन बँका त्यांना १० वेळा फेºया मारूनसुद्धा पास करत नाही. नालासोपाºयात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असल्यामुळे या ना त्या नावाने बोगस संस्था व मानवाधिकार संघटना काढून त्यांना ब्लॅकमेल करून पैसे कमविण्याचा धंदा सुरु आहे. प्राचीन महत्त्व असलेल्या नालासोपाºयाचे आता ‘बोगस’ नावापासून रक्षण करणे ही काळाची गरज आहे एवढे मात्र निश्चित!
नालासोपारा शहराला प्राचीन महत्त्व आहे पण या बोगस नावाने खरोखर नालासोपारा शहराला कलंकित केले आहे. वेळीच यावर प्रशासनने लक्ष दिले नाही तर नालासोपारा याच नावाने कुविख्यात होईल.
- राज दसोनी,
माहिती अधिकार कार्यकर्ता
बोगस या शब्दाने नालासोपारा शहराचे नाव का बदनाम झाले . कोणीही राजकारणी याकडे लक्ष देत नाही. जिथे आपण राहिलो, खेळलो, आज मोठे झालो, नावारूपाला आलो ते सगळे त्याकडे का दुर्लक्ष करतात. कुठे नेऊन ठेवला आमचा नालासोपारा.
- आशिष कर्णिक, रहिवासी, नालासोपारा शहर