आता नालासोपारा नायजेरियनांचा अड्डा; पोलिसांच्या दप्तरी मात्र खूपच कमी नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 06:50 AM2023-09-05T06:50:51+5:302023-09-05T06:50:58+5:30
तुळींज येथे १३ आणि नालासोपारा येथे फक्त २ असे बोटावर मोजण्याइतक्याच नायजेरियन नागरिकांची पोलिस ठाण्यात नोंद आहे.
- मंगेश कराळे
नालासोपारा : नालासोपारा शहराच्या पूर्व आणि पश्चिम परिसरात नायजेरियन नागरिकांचा जणू अड्डाच बनला आहे. नायजेरियन नागरिकांच्या गँग शहरात फसवणूक, लॉटरी स्कीम, कोट्यवधी रुपयांचे बक्षीस लागल्याचे मेसेज, असे अनेक गैरधंदे बिनधास्त करीत असतात. तसेच अमली पदार्थांच्या तस्करी व विक्रीमध्ये यांचा सहभाग असल्याचे गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल असून, आजवर कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
नालासोपारा परिसरातील आचोळेगाव, अलकापुरी, मोरेगाव, ओस्तवालनगर, प्रगतीनगर, रेहमतनगर, हनुमाननगर या परिसरात मोठ्या प्रमाणात ते अनधिकृतपणे राहतात. मात्र तुळींज येथे १३ आणि नालासोपारा येथे फक्त २ असे बोटावर मोजण्याइतक्याच नायजेरियन नागरिकांची पोलिस ठाण्यात नोंद आहे.
तुळींज आणि नालासोपारा पोलिस ठाण्यांतर्गत अंदाजे दीड ते दोन हजार नायजेरियन नागरिक राहत असल्याचे कळते. पोलिस प्रशासन वेळीच कारवाई करीत नसल्यामुळे नायजेरियनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये आहे. मीरा-भाईंदर, मुंबई, नवी मुंबई येथील नायजेरियन नागरिक राहण्यासाठी नालासोपारा शहर गाठतात. पोलिसांनी जर वेळीच कडक कारवाई केली नाही, तर भविष्यात हे नागरिक डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नायजेरियनांनी थाटले अनधिकृत बार
प्रगतीनगर परिसरात नायजेरियनांनी ४ ते ५ अनधिकृत बार थाटले आहेत. तुळींज पोलिसांनी मागे या बारवर कारवाई करून ते फोडले होते. शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत मुंबई, नवी मुंबई, मीरा-भाईंदर येथून शेकडो नायजेरियन येऊन एकत्र रात्रभर मोठ्या आवाजात गाणी लावून पार्ट्या करतात. या परिसरातील काही इमारतींमधील अनेक सदनिकांत नायजेरियन नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात.
भारतीय महिलांशी विवाह
काही नायजेरियनांनी अनोखी शक्कल लढवत आर्थिक व्यवहार करून काही भारतीय महिलांशी विवाह केले आहेत, तर काहींनी फक्त नावाला लग्न करून कागदोपत्री येथे राहत असल्याचा पुरावा गोळा केला आहे. काहींनी अमली पदार्थांचे गुन्हे दाखल होऊन अटक झाल्यावर सुटल्यानंतर नालासोपाऱ्यात बस्तान बसविले आहे.
दोन महिन्यांपूर्वी एका नायजेरियनकडून एक कोटीचे अमली पदार्थ पकडले होते. अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई सुरूच राहणार आहे. काही नायजेरियनांकडे आधार कार्ड व कागदपत्रे असल्याने कारवाई करण्यासाठी अडथळा निर्माण होतो. पासपोर्ट, व्हिसा नसल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो.
- अमर मराठे, पोलिस निरीक्षक, नार्कोटिक्स सेल