नालासोपारा पोलीस ठाणे बनले भंगाराचे गोडाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:14 PM2020-02-17T23:14:27+5:302020-02-17T23:14:46+5:30
शेकडो गाड्या लिलावाच्या प्रतीक्षेत : पोलिसांची डोकेदुखी वाढली
नालासोपारा : नालासोपारा शहरातील पश्चिमेकडील नालासोपारा पोलीस ठाण्याचा परिसर सध्या भंगाराचे गोडाऊन बनला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्या, अपघातामधील गाड्या तसेच चोरीच्या मोटार सायकल व टँकर, टेम्पो, ट्रक, रिक्षा सर्व गाड्या अनेक वर्षांपासून लिलावाच्या प्रतीक्षेत आहेत. या गाड्यांचा लिलाव न झाल्याने नालासोपारा पोलीस ठाण्याच्या परिसराला भंगाराचे गोडावून असे स्वरूप आले आहे.
नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध गुन्ह्यांमध्ये, चोरीच्या प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या गाड्या पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात जमा आहेत. दरम्यान, नालासोपाऱ्यातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलिसांनी अनेक चोरीच्या व गुन्ह्यांमधील शेकडो गाड्या जप्त केलेल्या होत्या. पण या वाढत्या भंगार गाड्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती.
नालासोपारा शहरातील गुन्ह्यांमधील अनेक गाड्या जप्त असून काही केसेसमधील गाड्यांबाबत कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल.
- वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
नालासोपारा पोलीस ठाणे