नालासोपारा पोलिसांनी घेतली पावसाची धास्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:15 AM2019-07-15T00:15:03+5:302019-07-15T00:15:11+5:30
पावसाचे पाणी आत शिरू नये म्हणून येथील पोलीस ठाण्याच्या प्रत्येक दरवाजात पोलिसांनी लाकूड आणि मार्बलचे आडोसे उभारले आहेत.
नालासोपारा : पावसाचे पाणी आत शिरू नये म्हणून येथील पोलीस ठाण्याच्या प्रत्येक दरवाजात पोलिसांनी लाकूड आणि मार्बलचे आडोसे उभारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या धो-धो पावसामुळे नालासोपारा शहरात गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही पूरस्थिती निर्माण झाली होती. तिचा धसका घेऊन त्यांनी हि कारवाई केली आहे.
तुळींज आणि नालासोपारा पोलीस ठाण्यातही पावसाचे पाणी घुसल्याने पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली होती.
नालासोपारा पोलीस ठाण्याच्या आवारात आणि विविध अधिकाऱ्यांच्या, ठाणे अंमलदार कक्षात गुढघाभर पाणी २ ते ३ दिवस होते. पश्चिमेकडील पोलीस ठाण्यात असलेल्या लॉकअपमध्ये सुद्धा पावसाचे पाणी घुसल्याने पकडलेल्या अंदाजे ४ ते ५ आरोपींनाही वसईमधील पोलीस ठाण्यात नेऊन ठेवण्यात आले होते. पोलीस ठाण्यात पावसाचे पाणी घुसल्याने कागदपत्रे, टेबल, खुर्च्या, संगणक, प्रिंटर व इतर साहित्य भिजणार नाही याची दक्षता घेत सुरक्षित स्थळी पोलिसांनी हलविले होते. नालासोपारा पोलीस ठाण्यात तर पावसाचे २ ते ३ फूट पाणी साचले होते. याचीच धास्ती घेऊन प्रत्येक खोलीच्या दरवाज्याला विटांचे, मार्बलचे आडोसे उभे केले आहेत.