नालासोपारा एसटी डेपोत व्हीलचेअरच नाही, रॅम्पचा घेतला जातो आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:29 AM2021-02-06T03:29:42+5:302021-02-06T03:30:37+5:30

Nalasopara ST Depot : शहरातील एसटी डेपोमध्ये ज्येष्ठ व अपंगांसाठी एकही व्हीलचेअर नसून त्यांना रॅम्पचा आधार घेत बसमध्ये प्रवेश घ्यावा लागत आहे.

Nalasopara ST Depot is not only wheelchair, the ramp is taken as the basis | नालासोपारा एसटी डेपोत व्हीलचेअरच नाही, रॅम्पचा घेतला जातो आधार

नालासोपारा एसटी डेपोत व्हीलचेअरच नाही, रॅम्पचा घेतला जातो आधार

Next

- मंगेश कराळे
नालासोपारा : शहरातील एसटी डेपोमध्ये ज्येष्ठ व अपंगांसाठी एकही व्हीलचेअर नसून त्यांना रॅम्पचा आधार घेत बसमध्ये प्रवेश घ्यावा लागत आहे. मात्र, वृद्ध आणि अपंगांना बसमध्ये प्रवेश घेताना त्रास होणार नाही याची काळजी डेपोमधील कर्मचारी घेत असल्याची माहिती बसस्थानक प्रशासनाकडून देण्यात आली.

नालासोपारा हे पश्चिम रेल्वेवरील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला जवळच हा डेपाे आहे. या डेपोतून ठाणे, बोरीवली, दापोली, कोल्हापूर, सांगोला, लातूर, गेवराई, रत्नागिरी, अलिबाग, जेजुरी, झांझवड, खेड, गुहागर, स्वारगेट अशा विविध ठिकाणी बस रवाना हाेतात. आजूबाजूच्या तालुक्यांतील विविध गावांसाठीही येथून बस आहेत. दररोज इतर व तालुक्यात अनेक ठिकाणी १३० बस सोडतात. त्यामुळे या डेपोतून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. त्यात दिव्यांग आणि अपंगांची संख्या तुरळक असते. तर ज्येष्ठ नागरिकही थोड्या फार प्रमाणात प्रवास करतात. त्यांना व्हीलचेअर नसल्याने रॅम्पचा आधार घ्यावा लागत आहे. 

व्हीलचेअर नसल्याने गैरसोय
नालासाेपारा स्थानकात व्हीलचेअरच नसल्यामुळे दिव्यांग प्रवाशांचे हाल हाेत आहेत. त्यांना गाडीपर्यंत जाताना अनेकदा खूप त्रास हाेत आहे. याबाबत काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. 

बसस्थानकात व्हीलचेअर नाही, पण रॅम्प बनविण्यात आले आहेत. आजपर्यंत व्हीलचेअरची गरजच भासली नाही. डेपोमधील कर्मचारी आणि स्टाफ कोणालाही बसमध्ये चढण्या व उतरण्यासाठी त्रास होणार नाही याची दक्षता घेतात. याबाबत त्यांना लक्ष घालण्यास सांगितले आहे.
- प्रज्ञा सानप-उगले
आगार व्यवस्थापक, नालासोपारा डेपो  

 रॅम्पची सुविधा नाही
नालासोपारा एसटी डेपोमध्ये दिव्यांग, अपंग आणि ज्येष्ठांसाठी व्हीलचेअर नाही. मात्र, एकमेव रॅम्प आहे. त्याचा वापर हाेत आहे. परंतु एकच रॅम्प असल्यामुळे माेठी गैरसाेय हाेत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, वृद्धांसाठी आणखी रॅम्प उपलब्ध करण्याची मागणी हाेत आहे. 

वसई, विरार आणि नालासोपारा स्थानकांत व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध नाही. याबाबत संघटनेच्या माध्यमातून पत्रव्यवहार केलेला आहे. पण, ती अद्यापपर्यंत कुठेही सुरू झालेली नाही.
- देवीदास केंगार
अध्यक्ष, 
अपंग जनशक्ती 

व्हीलचेअरबाबत विचारणा केली तर ती सुविधा उपलब्ध नाही. मला दररोज बसमध्ये चढण्यासाठी किंवा इतर दिव्यांग, अपंगांना त्रास होणार नाही याची डेपोतील कर्मचारी, स्टाफ जातीने लक्ष घालून मदत करतात.
- जनार्दन पाटील, 
ज्येष्ठ नागरिक, प्रवासी

Web Title: Nalasopara ST Depot is not only wheelchair, the ramp is taken as the basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.