Nalasopara: सावत्र आईने दोन अल्पवयीन मुलांना दिले चाकूने चटके, वालीवच्या फादरवाडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 01:57 PM2024-08-23T13:57:17+5:302024-08-23T13:57:50+5:30
Nalasopara Crime News: एका सावत्र आईनेच ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगावर तर ८ वर्षाच्या मुलाच्या हातावर चाकूने चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर घटना ही वालीवच्या फादरवाडी परिसरात घडली आहे.
- मंगेश कराळे
नालासोपारा - एका सावत्र आईनेच ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगावर तर ८ वर्षाच्या मुलाच्या हातावर चाकूने चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर घटना ही वालीवच्या फादरवाडी परिसरात घडली आहे. दोन्ही मुलांच्या वडिलांनी गुरुवारी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.
फादरवाडीच्या सनशाईन ग्रीन पार्क बिल्डिंग नंबर १ मध्ये नागनाथ सावसगळी (३२) हे दुसरी पत्नी नेहा आणि पहिल्या पत्नीपासूनचे ८ आणि ७ वर्षांच्या दोन्ही मुलांसह राहतात. नागनाथ यांचे पहिल्या पत्नीपासून सोडचिट्ठी झाल्यापासून दोन्ही मुलांचे पालन पोषण व सांभाळ ते करतात. जून महिन्यात वेळोवेळी आरोपी सावत्र आई नेहा हिने ८ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात घरातील पकडीने मारहाण व हातावर गरम चाकूने चटके देऊन तर दुसऱ्या ७ वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगवर गरम चाकूने चटके देवून पोळी बनविण्याचे लाकडी लाटण्याने त्याचे डावे हाताचे कोपरावर व उजवे कानाखाली मारून जखमी केले. तसेच दोघांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देत घरातील फरशी पुसणे, झाडू मारणे व भांडी घासण्याचे काम करून घेतले. सदर प्रकाराबाबत वडिलांना काही सांगितले तर आणखीन मारहाण करण्याची धमकी सुद्धा सावत्र आईने दोन्ही मुलांना दिली होती. दोन्ही मुलांच्या वडिलांनी गुरुवारी संध्याकाळी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन मुलांची काळजी व संरक्षण कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी तक्रार आल्यावर सावत्र आईवर गुन्हा दाखल केला आहे. तिने एका मुलाच्या हातावर आणि दुसऱ्या मुलाच्या गुप्तांगावर गरम चाकूने चटके देऊन मारहाण केली आहे. आरोपी आईला शुक्रवारी पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी व तपास करणार आहे.
- जयराज रणवरे
(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे)