नंडोरेच्या आश्रमशाळेचे काम अखेर सुरू
By admin | Published: June 25, 2016 01:26 AM2016-06-25T01:26:27+5:302016-06-25T01:26:27+5:30
पालघरनजीक नंडोरे येथे आदिवासी विकास विभाग प्रकल्प डहाणूअंतर्गत येत असलेल्या नंडोरे आश्रमशाळेच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शालेय इमारतीचे काम अखेरीस सुरू झाले.
पालघर/नंडोरे : पालघरनजीक नंडोरे येथे आदिवासी विकास विभाग प्रकल्प डहाणूअंतर्गत येत असलेल्या नंडोरे आश्रमशाळेच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शालेय इमारतीचे काम अखेरीस सुरू झाले.
नंडोरे येथे असलेली ही आश्रमशाळा पूर्वी तेथे असलेल्या जुन्या खोल्यांमध्येच पहिली ते १२ वी चे वर्ग भरवत होते. मात्र, दरवर्षी वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे व जीर्ण झालेल्या या खोल्या विद्यार्थ्यांसाठी अपुऱ्या पडू लागल्या. परिणामी, आदिवासी विकास विभाग डहाणूने हे लक्षात घेऊन नवीन शालेय इमारतीचा प्रस्ताव व निधीही मंजूर करवून घेतला होता. या इमारतीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत निविदाही काढल्या गेल्या व ठेकेदार शिक्कामोर्तब झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इमारतीचे काम त्या वेळी सुरू झाले.
इमारतीचे बांधकाम जवळपास ६० टक्के पूर्णही झाले होते. मात्र, ठेकेदार रायगड सिंचन घोटाळ्याप्रकरणी अडकल्यामुळे इमारतीचे काम तसेच ठप्प झाले. आदिवासी विकास विभाग व आश्रमशाळा प्रशासनाने इमारतीचे काम सुरू करण्यासाठी बऱ्याच वेळा बांधकाम विभागाशी पत्रव्यवहारही केला व बांधकाम विभागाने ठेकेदारास नोटिसाही बजावल्या. परिणामी, ठेकेदाराकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. लोकमतने हे प्रकरण दोन वेळा प्रसिद्ध केले व इमारतीचे काम सुरू करण्यासाठी बांधकाम विभागाकडे पाठपुरावाही केला. पाठपुराव्याची दखल घेत या इमारतीच्या बंद कामाची फाइल उघडून मध्यस्थी पडून या प्रकरणात तोडगा काढत इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा केला. (वार्ताहर)