नालासोपाऱ्यात पुन्हा १० लाखांचे अंमली पदार्थ पकडले; पोलिसांची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 07:25 PM2023-03-16T19:25:19+5:302023-03-16T19:25:51+5:30
नालासोपाऱ्यात पुन्हा १० लाखांचे अंमली पदार्थ पकडले.
(मंगेश कराळे)
नालासोपारा: शहरात मार्च महिन्याच्या १५ दिवसांत तिसऱ्यांदा लाखो रुपये किंमतीचे अंमली पदार्थ पोलिसांनी पकडले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पुन्हा एकदा शहरात मिळाल्याने खळबळ माजली असून ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी बुधवारी रात्री गुन्हेगारी वॉच पेट्रोलिंग करताना दोन आरोपींना पकडून लाखो रुपये किंमतीचे एम डी आणि चरस हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. आचोळे पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार आचोळे पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गुन्हेगारी वॉच पेट्रोलिंग करीत असताना नालासोपारा वसई लिंक रोडवरील चंदन नाका या ठिकाणी दोघे संशयास्पदरित्या फिरताना दिसले. दोघांची दोन पंचा समक्ष अंग झडती घेतली असता आरोपी तोसिफ युसुफ पटेल (३८) याच्या कब्जात १० लाख रुपयांचे ५० ग्रॅम एमडी आणि मेहंदी मोहम्मद अली शिराजी (४२) यांच्याकडून ६४ हजारांचे ८ ग्रॅम चरस असा एकूण १० लाख ६४ हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ मिळून आला. दोन्ही आरोपी विरोधात एनडीपीएस अंतर्गत आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सागर बारावकर, सचिन घेरे, शंकर शिंदे, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव, संतोष चव्हाण यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.