नरेश आकरे राष्ट्रवादीचे गटनेते
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 11:25 PM2020-02-03T23:25:00+5:302020-02-03T23:25:20+5:30
पालघर जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.
पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. सत्ता स्थापनेसाठी १६ सदस्य निवडून आलेल्या आणि क्र. दोनचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने नरेश आकरे यांची गटनेतेपदी एकमताने निवड केली. येत्या १८ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड होण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकूण ५७ सदस्यांपैकी शिवसेना १८, राष्ट्रवादी १४, भाजप १२, बविआ ४ माकप ६ काँग्रेस १ व अपक्ष २ असे बलाबल आहे. जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरेंसह अन्य एक अपक्ष आणि काँग्रेसचा एक सदस्य असे सगळे मिळून राष्ट्रवादीचे एकूण संख्याबळ १७ होते. १८ फेब्रुवारीला होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी-काँग्रेसला स्पष्ट बहुमत (३५ सदस्य) प्राप्त होत असल्याने त्यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे.
राष्ट्रवादीच्या वतीने आज गटनेता निवडीची प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या समोर पार पडली. यात राष्ट्रवादीचे १४ सदस्य आणि २ अपक्ष असे मिळून १६ सदस्यांच्या गटांची नोंदणी करण्यात आली. आणि गटनेते पदाच्या निवडीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.