पालघर स्थानकाबाहेर पुन्हा फडकला राष्ट्रध्वज; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 01:59 AM2020-12-02T01:59:50+5:302020-12-02T01:59:55+5:30
आ. वणगा यांनी ३० नोव्हेंबरच्या आत ध्वज पुन्हा न लावल्यास सेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा दिल्याबरोबर रेल्वे प्रशासन हलले आणि तिरंगा डौलाने फडकला.
पालघर : पालघर रेल्वे स्थानकासमोर वर्षभरापूर्वी डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज अचानक काढून टाकण्यात आल्यावर तो पुन्हा लावण्याच्या विनंतीला रेल्वे प्रशासन दाद देत नसल्याने आमदार श्रीनिवास वणगा आणि डहाणू-वैतरणा सेवाभावी संस्थेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने नमते घेतल्याने येथे पुन्हा राष्ट्रध्वज डौलाने फडकू लागला आहे.
भारतीय रेल्वेतर्फे देशातील प्रमुख आणि महत्त्वांच्या रेल्वे स्थानकांवर ३०×२० फुटांचे आणि १०० फूट उंचीवर राष्ट्रध्वज लावण्याच्या आदेशान्वये पालघर स्थानकासमोर वर्षभरापूर्वी ध्वज फडकविण्यात आला होता. याचे जोरदार स्वागत पालघरवासीयांनी केले होते. परंतु कुठलेही ठोस कारण न देता प्रशासनाने विविध तांत्रिक अडचणी सांगून ऑगस्ट महिन्यापासून हा राष्ट्रध्वज काढून टाकला होता.
प्रवाशांनी आणि प्रवासी संघटनांनी वेळोवेळी पाठपुरावा करून मुद्दा उचलून धरला. पण निर्ढावलेल्या रेल्वे प्रशासनाने थातूरमातूर उत्तरे देऊन वेळकाढूपणा सुरू केल्याचे आणि आश्वासनांची खैरात केल्याचा अनुभव संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनाची भेट घेताना आल्याचे सांगितले. ही बाब संघटनेने आमदार वणगा, जिल्हाध्यक्ष राजेश शहा यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी पालघर अधीक्षकांची भेट घेतल्यावर लवकरच राष्ट्रध्वज लावून देण्याचे आश्वासन पुन्हा दिले. आ. वणगा यांनी ३० नोव्हेंबरच्या आत ध्वज पुन्हा न लावल्यास सेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा दिल्याबरोबर रेल्वे प्रशासन हलले आणि तिरंगा डौलाने फडकला.