विजय पावबाकेंना राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:12 PM2019-07-22T23:12:20+5:302019-07-22T23:12:32+5:30
राष्ट्रपतींच्या हस्ते होणार प्रदान : पाच झिरो बजेट नवोपक्र मांची नोंदणी
डहाणू/बोर्डी : श्री अरविंदो सोसायटी आणि एचडीएफसी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांनी बनवलेल्या झिरो बजेट शैक्षणिक साहित्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गोवणे प्राथमिक शाळेतील शिक्षक विजय पावबाके यांना तो जाहीर झाला असून राष्ट्रपतींच्या हस्ते लवकरच तो प्रदान केला जाणार आहे.
या स्पर्धेसाठी शून्य रुपयात हॅण्डवॉश स्टेशन, फक्त दोन स्तंभात एक ते शंभर संख्या, बहुउद्देशीय इंग्रजी बोर्ड, झिरो बजेट पपेटस्क्रीन, झिरो बजेट ब्रेन एक्सरसाइज आदी पाच नवोपक्रमांची आॅनलाइन नोंदणी पावबाके यांनी केली होती. देशभरातून प्राप्त झालेल्या नवोपक्रमांमधून त्यांच्या या पाचही उपक्रमांची निवड झाली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे आयोजकांनी कळविल्याचे पावबाके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवणे दिवसेंदिवस अधिक जिकिरीचे होते आहे. याकरिता विद्यार्थ्यांना अधिकाधिक नावीन्यपूर्ण उपक्र मात गुंतवून शाळेची ओढ लावण्यासाठी अनेक शिक्षक अध्यापनात नवोपक्रमांची जोड देतात. यातूनच हे उपक्र म साकारले. यासाठी सहशिक्षक, मुख्यध्यापकांपासून ते गटशिक्षणाधिकारी आदी सर्वांची मदत मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात.
विद्यार्थ्यांमधे गुणवत्ता विकास होण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शिक्षक अगदी कमी खर्चात दर्जेदार आणि टिकाऊ अध्यापन साहित्य बनवत असतात. अशा सर्व शिक्षकांनी ऑनलाइन भाग घेऊन जिल्ह्याचा स्पर्धेतील सहभाग वाढवावा. - विजय पावबाके, (राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्काराचे मानकरी शिक्षक)