270 खासगी रुग्णालयांना इलेक्ट्रिक ऑडिटच्या नाेटिसा; ‘विजयवल्लभ’ प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 11:42 PM2021-04-30T23:42:34+5:302021-04-30T23:42:40+5:30
‘विजयवल्लभ’ प्रकरण : महापालिकेचे विद्युत विभागालाही पत्र
पारोळ : कोविड रुग्णालयांना लागलेल्या आगीत होरपळून रुग्णांच्या झालेल्या मृत्यूनंतर रुग्णालयांच्या विद्युत, अग्नी व उद्वाहन परीक्षणाबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील यंत्रणेला आदेश दिले आहेत. या आदेशांची अंमलबजावणी सुरू असताना वसई-विरार शहर महापालिकेनेही कोविड रुग्णालयांच्या अग्नी, विद्युत आणि उद्वाहन परीक्षणासंदर्भात रुग्णालयांना नोटिसा पाठविल्या आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आदेशानंतर वसई-विरार शहर महापालिकेने पालिकेच्या नऊ रुग्णालयांचे विद्युत संचमांडणीचे ऑडिट करण्याचे पत्र विद्युत विभागाला दिले आहेत. तसेच २७० खासगी रुग्णालयांना विद्युत संच मांडणीचे व उद्वाहन (लिफ्ट) परीक्षण करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.
विरारमधील विजयवल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर वसई-विरारमधील यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. गुरुवारी वसईतील फायर ऑडिट न झालेली दोन कोविड रुग्णालये महापालिकेने बंद केली. त्यामुळे आधीच बेड नसलेल्या काळात ७० बेडची संख्या कमी झाली आहे. वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रात बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रामुख्याने औद्योगिक वसाहती आणि रुग्णालये यांची नैतिक जबाबदारी ही आहे की त्यांनी आर्थिक देवाणघेवाणीला प्राधान्य न देता सरळ फायर ऑडिट करून घ्यावे. मात्र, बऱ्याच रुग्णालयांनी अशा प्रकारची फायर ऑडिट, विद्युत संच मांडणी ऑडिट आणि उद्वाहन परीक्षण केलेले नसल्याने विजयवल्लभसारख्या घटना घडण्याचा धोका मोठा आहे.
राज्यभरात घडलेल्या काही घटनांनंतर व सध्याच्या कोविडकाळात मोठ्या प्रमाणात रुग्णालये खचाखच भरलेली असताना विद्युत संचमांडणी, फायर ऑडिट, उद्वाहन ऑडिट करण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. दरम्यान, ऊर्जामंत्र्यांच्या आदेशानंतर ऊर्जा विभागाने यासंदर्भात २६ एप्रिल रोजी परिपत्रक जारी केले. यानंतर राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक दिनेश खोंडे यांनी राज्यातील सर्व विद्युत निरीक्षकांशी व्हीसीद्वारे या विषयावर चर्चा केली. खबरदारी घेऊन ही तपासणी कशी पार पाडता येईल यावर या बैठकीत चर्चा झाली.