म्हसाला पोलीस छावणीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:00 AM2019-01-20T01:00:00+5:302019-01-20T01:00:22+5:30
म्हसा यात्रा सोमवारपासून सुरू होत आहे. यात्रेला लाखो भाविक येतात.
मुरबाड : म्हसा यात्रा सोमवारपासून सुरू होत आहे. यात्रेला लाखो भाविक येतात. येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी २९ अधिकारी व २०० पोलीस कर्मचारी आणि ५० होमगार्ड असा ३००च्या आसपास फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक वसावे यांनी सांगितले.
पूर्वी १५ दिवस चालणारी यात्रा आता जेमतेम आठ दिवसांत संपते. यात्रेत तमाशा, मौत का कुवाँ, आकाशपाळणे असे मनोरंजनाचे कार्यक्र म होत असल्याने हुल्लडबाजी करणाऱ्या प्रेक्षकांना आवरणे अवघड जाते. काही वेळेला तर कलाकारांना मारहाणही झालेली आहे. यात्रेत कधीकधी खिसेकापूंनी हातसफाई केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मागील वर्षी तर महिला खिसेकापूंनी हातसफाई केली होती.
यावर्षी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसा यात्रेत बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडण्यासाठी मुरबाडचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अजय वसावे व त्यांच्या सोबतीला आणखी दोन पोलीस निरीक्षक, २५ पोलीस उपनिरीक्षक, १५० पुरु ष पोलीस कर्मचारी, ३५ महिला कर्मचारी, ५० होमगार्ड व त्यांच्या सोबतीला शीघ्र कृती दलाचे जवान असणार आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे. खांबलिंगेश्वर देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरात १० व ग्रामपंचायतीने यात्रेच्या परिसरात १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असल्याचे वसावे यांनी सांगितले. यात्रेच्या काळात बेकायदा व्यवसाय सुरू असतात. त्याला आवर घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र चार पथके तैनात केली आहेत. शिवाय, साध्या वेशातील पोलीसही संपूर्ण यात्रा परिसरात लक्ष ठेवणार आहेत.
>खासगी पार्किंगची सुविधा
यात्रेतील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पार्किंगचा असतो. यासाठी सहा ठिकाणी खाजगी पार्किंग सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्यांच्याकडून वाहनचालकांची लूट होण्याची शक्यता असते. त्यामुळे अव्वाच्या सव्वा पार्किंगचे दर घेणाºया जागामालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वसावे यांनी सांगितले. आलेल्या भक्तांना खांबलिंगेश्वराचे दर्शन व्यवस्थित घेता यावे, यासाठी देवस्थान ट्रस्टने योग्य ते नियोजन केल्याचे अध्यक्ष दशरथ पष्टे यांनी सांगितले.
म्हसा यात्रेसाठी मोठ्या संख्येने बैल, म्हशी विक्रीसाठी आणल्या जातात. या प्राण्यांना लसीकरण करणे पशुधन विभागाची जबाबदारी असल्याने मुरबाड तालुका पशुधन विभागाने आठ दिवसांसाठी आरोग्य पथक तैनात करणार आहे. शिवाय, पशुधन वाचवण्यासाठी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
या प्रदर्शनाच्या उद््घाटनप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, अर्जुन खोतकर, आमदार किसन कथोरे, खासदार कपिल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा जाधव, उपाध्यक्ष सुभाष पवार आदी उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात ३५ स्टॉल लावले जाणार आहेत.