कामांचे स्वरुप गुंतागुंतीचे, एकाच वेळी तीन आघाड्यांवर झुंज सुरु
By admin | Published: July 6, 2016 02:27 AM2016-07-06T02:27:45+5:302016-07-06T02:27:45+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू रोड रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी मालगाडीचे अकरा डबे घसरल्याने अपघातग्रस्त झालेल्या पश्चिम रेल्वेला पूर्ववत करण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत.
- शौकत शैख, डहाणू
पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू रोड रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी मालगाडीचे अकरा डबे घसरल्याने अपघातग्रस्त झालेल्या पश्चिम रेल्वेला पूर्ववत करण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत. वादळीवारे, पाऊस याच्याशी सामना करीत लोहमार्ग पूर्ववत करणे ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणा अशा तीन आघाड्यांवर सहाशे कर्मचारी, तंत्रज्ञ, अभियंते अहोरात्र काम करीत आहेत.
सोमवारी दुपारी २.४० वाजल्यापासून तीन नंबर लाइन मोकळी करण्यात आली व तिच्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी ,आॅगस्ट क्रांती, राजधानी, दुरान्तो ,अवंतिका अशा मेल, एक्स्प्रेस गाडया पाठविण्यात आल्या तर उखडलेली रेल्वेलाइन पूर्ववत करण्याच्या दृष्टीने तुटलेले स्लीपर बसवून त्यावर रूळ बसविणे, तुटलेली ओव्हरेड वायर नव्याने बसविणे, शिवाय उखडून गेलेली सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी केबिन टाकणे हि कामे रेल्वेचे सहाशे कर्मचारी, तंत्रज्ञ रात्रभर करत होते. त्यासाठी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल, विभागीय रेल व्यवस्थापक मुकुल जैन सर्व कामावर देखरेख करण्यासाठी तळ ठोकून आहेत. मुंबई कडे जाणाऱ्या एका लाईन वरुन सकाळी जाणाऱ्या फ्लार्इंग रानी, सयाजी नगरी , इंदूर ,बिकानेर या गाड्याना विरारपर्यन्त सर्व स्थानकांवर थांबा देण्यात आला तर गुजरातकडे जाणाऱ्या सौराष्ट्र एक्स्प्रेस, वापी पॅसेंजर ,सूरत शटल या गाडया रद्द करण्यात आल्या मात्र बिकानेर, इंदूर , अवध एक्स्प्रेस या गाडया एक नंबर फलाटावरून गुजरातकडे रवाना करण्यात आल्या. लोकल सेवा बोईसर रेल्वे स्थानकापर्यंत सुरू आहे. तीे पूर्ववत होण्यासाठी अद्यापही एक दोन दिवसाचा अवधी लागण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त मालगाडीचे काही डबे घोलवड रेल्वेस्थानकात तर काही खांजणात ठेवण्यात आले आहेत.