नवरात्रीची धामधूम
By admin | Published: October 13, 2015 01:48 AM2015-10-13T01:48:20+5:302015-10-13T01:48:20+5:30
मंगळवारी घटस्थापना होत असल्याने तालुक्यातील अनेक नवरात्रोत्सव मंडळांनी सोमवारपासूनच देवीच्या मूर्ती आणण्यास प्रारंभ केला आहे.
वसई : मंगळवारी घटस्थापना होत असल्याने तालुक्यातील अनेक नवरात्रोत्सव मंडळांनी सोमवारपासूनच देवीच्या मूर्ती आणण्यास प्रारंभ केला आहे. ९ दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून वसई-डहाणू पट्ट्यामध्ये आदीशक्तीच्या ७ बहिणींचे वास्तव्य असून त्यांचा उत्सव या काळात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
जीवदानी डोंगरावरील जीवदानीदेवी, नायगाव येथील चंडिकादेवी व कालिकामाता, वजे्रश्वरी येथील वज्रेश्वरीदेवी, केळव्याची शीतलादेवी, उमेळ्याची सातमादेवी, डहाणूची महालक्ष्मी अशा ७ बहिणी येथे आहेत. या मंदिरांच्या व्यवस्थापनाकडून ९ दिवसांत विविध आध्यात्मिक कार्यक्रम आयोजिले जातात. नवरात्रीसाठी विविध वस्तूही विक्रीसाठी आल्या आहेत. रंगवलेले घट, दांडिया, कपाळावर बांधण्यात येणारे रंगीबेरंगी पट्टे, चनियाचोली या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहेत. सण साजरा करण्यावर अनेक निर्बंध आल्याने उशिरापर्यंत गरबा होण्याची शक्यता कमी आहे. त्यानुसार, प्रत्येक मंडळाला पोलिसांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)