नवी मुंबई पोलीस संघ अव्वल
By admin | Published: December 15, 2015 12:44 AM2015-12-15T00:44:09+5:302015-12-15T00:44:09+5:30
तारापूर येथे आयोजित केलेल्या ‘४२ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेतील बहुसंख्य क्रीडा प्रकारांमध्ये नवी मुंबई जिल्हा पोलीस संघाने सर्वात जास्त गुण मिळवून अव्वल स्थान
बोईसर : तारापूर येथे आयोजित केलेल्या ‘४२ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेतील बहुसंख्य क्रीडा प्रकारांमध्ये नवी मुंबई जिल्हा पोलीस संघाने सर्वात जास्त गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले असून त्याला विजेते पदाची ट्रॉफी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
तारापूर अणुऊर्जा केंद्र वसाहतीच्या भव्य मैदानावर ८ ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजित केलेलया या स्पर्धेमध्ये पालघर, ठाणे ग्रामीण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई असे एकूण सहा जिल्हा पोलीस संघ सहभागी झाले होते. तर त्या स्पर्धेत अॅथलेटीकस, खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, जलतरण, कुस्ती, वेटलिफ्टिींग, क्रॉसकंट्री, बॉक्सिंग, फुटबॉल, मॅरेथॉन, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, हॅमरफेक, उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
महिला सर्वसाधारण स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाने ८० गुण मिळवून प्रथम, पुरुष सर्वसाधारण स्पर्धेत नवी मुंबई संघाने १४६ गुण मिळवून प्रथम, महिला (सांघिक) स्पर्धेत नवी मुंबई संघाने ११७ गुण मिळवून प्रथम तर पुरुष (सांघिक) स्पर्धेत नवी मुंबई संघाने २०५ गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला. या स्पर्धेत सुमारे साडे सहाशे क्रीडापटू सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या समारोप व पुरस्कार वितरण प्रसंगी अधीक्षक राजेश प्रधान अप्पर पोलीस अधीक्षक वाय.बी. यशोद व श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस उपविभागीय अधिकारी जयंत बजबले (पालघर), विशाल गायकवाड (बोईसर), सचिव पाडकर (डहाणू), नरसिंह भोसले (वसई), प्रदीप जाधव (जव्हार) इ. सह राजकीय सामाजिक, उद्योग व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात कुठल्याही सोयीसुविधा नसतानाही शून्यातून उभ करून स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक शारदा राऊत व त्यांच्या टीमचे अभिनंदन करून यशस्वी स्पर्धकांचे कौतुक केले तर शारदा राऊत यांनी स्पर्धेचा आढावा घेतला तत्पूर्वी पत्रकार व पोलीस अधिकारी यांच्यामध्ये रस्सीखेच स्पर्धा झाली त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी बाजी मारतो.