Navratri : नवसाला पावणारी डहाणूची महालक्ष्मी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 12:22 AM2019-10-01T00:22:16+5:302019-10-01T00:22:29+5:30
अहमदाबाद महामार्गलगत चारोटीजवळ डहाणू स्टेशनपासून २६ कि.मी. अंतरावर विवळवेढे येथील श्री महालक्ष्मी मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. ही देवी जागृत असून नवसाला पावते, असा भाविकांचा विश्वास आहे.
कासा : मुंबई - अहमदाबाद महामार्गलगत चारोटीजवळ डहाणू स्टेशनपासून २६ कि.मी. अंतरावर विवळवेढे येथील श्री महालक्ष्मी मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. ही देवी जागृत असून नवसाला पावते, असा भाविकांचा विश्वास आहे.
या मंदिराचा गाभारा पश्चिमाभिमुख आहे. देवीचा मुखवटा दोनफुट उंचीचा लांबट चेहऱ्याचा असून शेंदूर चर्चित आहे. देवीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट आणि कुंडले आहेत. मागील बाजूस भव्य पाषाण असून याच पाषाणात दर्शनी मुखवटा कोरून काढला आहे. तसेच मंदिरासमोर सभा मंडप, यज्ञकुंड, दीपमाळा आहेत. पूर्वीचे मंदिर हे लाकडाचे होते. ते पावसामुळे खराब झाल्याने लाकडी खांब काढून दगडाचे ५८ मजबूत खांब बसवले आहेत. लोकांमध्ये ही देवी ‘कोळवणची महालक्ष्मी’ म्हणून प्रसिद्ध आहे.
वर्षभरात या देवीचे चैत्र पौर्णिमा उत्सव, नवरात्र उत्सव व बारसी उत्सव असे तीन उत्सव होतात. चैत्र महिन्याच्या पौर्णिमापासून पंधरा दिवस देवीची यात्रा भरते. हे येथील विशेष आकर्षण आहे. या यात्रेला महाराष्ट्रसह गुजरातमधून मोठ्या संख्येने भाविक येतात. या देवीला ऐतिहासिक महत्त्वही आहे. अकबर बादशहाच्यावेळी राजा तोरडमल येथे आला होता आणि त्याने देवीचे दर्शन घेतले, अशी इतिहासात नोंद आहे. तसेच पंजाबचा राजा रणजित सिंह यांनी पंजाब सर केल्यानंतर देवीची महापूजा करून मंदिरावर सोन्याचा कळस चढविला होता असा इतिहासाचा दाखला आहे. महालक्ष्मी मातेचे मूळ वास्तव तिथल्या मुसल्या डोंगरावर आहे. येथेही आता मंदिर उभारण्यात आले आहे. या डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे. साधारण ६०० पायºया चढून गडावरील मंदिराजवळ जावे लागते.