नेपाळहुन चरस आणणाऱ्या अन्सारीला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:54 PM2019-01-07T22:54:23+5:302019-01-07T22:54:25+5:30
कल्याणात चरसविक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी दुपारी अन्सारी याला अटक केली.
ठाणे : कल्याणात नेपाळहून विक्रीसाठी चरस घेऊन आलेला अजिमुद्दीन अन्सारी (५८, रा. बिहार) हा रेकॉर्डवरील तस्कर असून त्याला यापूर्वी मुंबई आणि बडोदा येथे अटक झाल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याला रविवारी कल्याण न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
कल्याणात चरसविक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी दुपारी अन्सारी याला अटक केली. यावेळी झडतीत त्याच्याकडून ११ किलो दोन ग्रॅम वजनाचे चरस, रोख रक्कम आणि मोबाइल फोन असा २२ हजार ४०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. अन्सारी याला २०१२ मध्ये मुंबई पोलिसांच्या बांद्रा गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीप्रकरणी अटक केली होती. त्या गुन्ह्यात तो २०१२ ते २०१७ दरम्यान कारागृहात होता. २०१७ मध्ये तो बाहेर आला होता. तत्पूर्वी त्याला बडोदा येथेही दोनवेळा अटक झाली होती. अन्सारी याच्या मुंबईतील गुन्ह्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. तसेच त्याचे आंतरराष्टÑीय स्तरावर तस्करांशी काही संबंध आहेत का, त्याचबरोबर त्याच्या साथीदारांचा आणि तो कल्याणात कोणाला चरसविक्रीसाठी आला होता, याचाही तपास सुरू आहे. ८ जानेवारी रोजी अन्सारीला विशेष ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रविवारी त्याला कल्याणच्या न्यायालयात हजर केले.
८ तारखेपर्यंत तुरुंगात
च्न्यायालयाने त्याला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली. याप्रकरणी महात्मा फुले चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत ढोले करत आहेत.