तर नायगाव पूलाचे उदघाटन रोखू, जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:46 PM2018-10-23T23:46:36+5:302018-10-23T23:46:38+5:30
जूचंद्र परिसरात उड्डाणपुल बांधण्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत पुलाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेने दिला आहे.
वसई : नायगावला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा मार्ग डिसेंबर २०१८ पर्यंत मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असतांना दुसरीकडे जूचंद्र स्थानकातील वाढती रेल्वे वाहतूक आणि त्याठिकाणी निर्माण झालेली वाहतूकीची कोंडी लक्षात घेता जोपर्यंत रेल्वेरूळावर जूचंद्र परिसरात उड्डाणपुल बांधण्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत पुलाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेने दिला आहे.
नायगाव उड्डाणपुलाचा उद्घाटनाचा मुहूर्त डिसेंबर महिन्याचा असला तरी पुलाचे काम मार्गी लागण्या बरोबरच जूचंद्र परिसरातील रेल्वे रूळांवरील उड्डाणपुलाचा प्रश्न हि तितक्याच जोमाने मार्गी लागावा यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.
दरम्यान नायगाव पूर्व-पश्चिम जोडणाºया पुलाचे काम सध्या अंितम टप्प्यात असून माहे डिसेंबर २०१८ पर्यंत पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला होण्याचे संकेत नुकतेच एमएमआरडीएकडून मिळाले. तत्पूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला तर प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागण्याची भीती ग्रामस्थांना आहे.
जूचंद्र रेल्वे स्थानकात वाढत्या रेल्वे वाहतूकीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा तर होणार मात्र हि समस्या लक्षात घेता जूचंद्र रेल्वे फाटक उड्डाणपूलाला मंजूरी मिळाली असली तरी अजून प्रत्यक्ष कामास सुरूवात झालेली नाही.
परिणामी नायगाव पुलाच्या उद्घाटनाला तूर्तास जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेने विरोध केला असून जोपर्यंत जूचंद्र येथील वाढत्या वाहतुककोंडीवर प्रशासन योग्यरित्या उपाययोजना करत नाही तोपर्यंत उड्डाणपुलाचा मुहूर्त कार्यक्रम भविष्यात होऊ देणार नसल्याचा गंभीर इशारा रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिला.
.जूचंद्र रेल्वे रुळावरचे प्रस्तावित काम मार्गी लावा !
जूचंद्र स्थित बापाणे ते नायगाव असा मुख्य रस्ता असून वसई-दिवा लोहमार्ग येथूनच गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे फाटक बसवण्यात आले आहेत. ज्यावेळी रेल्वेगाडी येते, तेव्हा हे फाटक बंद होते, त्यावेळी मोठी वाहतुककोंडी होते.साधारण दिवसातून ३० ते ४० वेळा हे फाटक बंद होते.या परिस्थितीत जर नायगाव पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले तर त्याचा फटका वाहनचालक आणि नागरिकांना बसेल, त्यामुळे एमएमआरडीए प्रशासनाने आधी फाटकाजवळ उड्डाणपुलाचे प्रस्तावित काम पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याची मागणी संघटनेने केली आहे.