Vidhan Sabha 2019: पालघरमधील राष्ट्रवादीचा उमेदवार सेनेच्या कार्यालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:57 AM2019-10-07T04:57:45+5:302019-10-07T04:58:13+5:30
घोडा हे शिवसेनेचे मावळते आमदार आहेत.
पालघर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शब्दाखातर रिंगणात उतरलेले श्रीनिवास वनगा यांचा मार्ग निर्धोक व्हावा म्हणून तेथील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार अमित घोडा यांना दुपारी शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यात आणि नंतर मुंबईत वरिष्ठ नेत्यांकडे नेल्याची जोरदार चर्चा आहे.
घोडा हे शिवसेनेचे मावळते आमदार आहेत. संधी नाकारल्यामुळे त्यांनी अर्ज भरताना शेवटच्या क्षणी राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते रिंगणात उतरल्यानंतरही कॉँग्रेस पक्षाने माजी आमदार शंकर नम यांचा मुलगा योगेश याला तेथून रिंगणात उतरविले होते. कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसमधील वाटाघाटींनुसार भिवंडी ग्रामीण आणि पालघर या मतदारसंघातील उमेदवार परस्परांसाठी माघार घेणार होते. त्यात पालघरमध्ये नम माघार घेतील, असे ठरले होते. मात्र दिवसभर घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींत घोडा यांना ‘तुमचा अर्ज बाद होईल’, असे सांगून दुपारी शिवसेनेच्या कार्यालयात बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येते. तेथून नंतर त्यांना आधी ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांना मुंबईत नेण्यात आले. त्यामुळे उद्या घोडा माघार घेतील असे शिवसेनेचे स्थानिक नेते खासगीत सांगत आहेत. त्यामुळे वाटाघाटीत कॉँग्रेसकडून हा मतदारसंघ पदरात पाडून घेणाऱ्या राष्टÑवादी कॉँग्रेसची पंचाईत झाली आहे. अखेर घोडा माघार घेतील आणि नम रिंगणात राहतील, अशी चर्चा सुरू आहे.
या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात दोन्ही कॉँग्रेस, बहुजन विकास आघाडी, माकप यांच्यासह विविध पक्षांची महाआघाडी रिंगणात आहे. तिला निवडणूक रंगात येण्यापूर्वीच शिवसेनेने धक्का दिला आहे.