"राणेंना 'पब्लिसिटी स्टंट'चा मोह आवरता आला नाही, लोकांचं आरोग्य वेठीस धरलं", भाजपाच्या यात्रेवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 09:22 AM2021-08-22T09:22:00+5:302021-08-22T09:22:39+5:30
"कोविड प्रादुर्भावाच्या काळात जनआशिर्वाद यात्रा काढून गर्दी जमवणं हे लोकांच्या आरोग्याशी खेळणं आहे हे नारायण राणे यांना कळायला हवं होतं"
कोविड प्रादुर्भावाच्या काळात जनआशिर्वाद यात्रा काढून गर्दी जमवणं हे लोकांच्या आरोग्याशी खेळणं आहे हे नारायण राणे यांना कळायला हवं होतं. ते अमित शाह किंवा जे. पी. नड्ढा यांना तसं सांगू शकले असते. परंतु पब्लिसिटी स्टंटचा मोह केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना आवरता आला नाही. त्यासाठी त्यांनी लोकांचं आरोग्य वेठीस धरले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी पत्रकार परिषदेत केला.
भाजपाच्या जनआशिर्वाद यात्रेची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आजपासून पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहिली पत्रकार परिषद वसई येथे पार पडली. यावेळी क्लाईड क्रास्टो यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
आपलं अपयश झाकण्यासाठी आणि लोकांचं लक्ष केंद्रसरकारच्या अपयशापासून इतरत्र वळवण्यासाठी हे भाजपाचे प्रयत्न असल्याचे क्लाईड क्रास्टो यांनी स्पष्ट केले.
पेट्रोल, डिझेल व स्वंयपाकाच्या गॅसच्या दरात झालेली विलक्षण वाढ आणि त्यामुळे महागाई वाढली आहे. सात वर्ष मोदी सरकारला झाली. परंतु सात वर्षांत जे काम केलंच नाही ते केलं म्हणून सांगण्याचा भाजपाचा प्रयत्न राहिला आहे असा आरोपही क्लाईड क्रास्टो यांनी केला.
राज्यात महाविकास आघाडी सरकारने कोविडच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवले.आता सध्या सर्वात जास्त काळजी घेण्याचा काळ आहे. एकमेकांना सांभाळून घेण्याचा हा काळ आहे. त्यावेळी गर्दी करून कसं चालेल असे सांगतानाच नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी शिवसेना आणि काँग्रेस पक्षांच्या सरकारमध्ये महत्त्वाची पदं भूषविली आहेत. आता ते भाजपामध्ये गेले आहेत. मात्र कोविड प्रादुर्भावाच्या काळात अशाप्रकारची यात्रा काढून गर्दी जमवणं हे लोकांच्या आरोग्याशी खेळणं आहे हे त्यांना कळायला हवं होतं असेही क्लाईड क्रास्टो म्हणाले.
कोविडच्या दुसऱ्या लाटेचे दूरगामी परिणाम देशावर झाले आहेत. तेव्हाही आयसीएमआर, डब्लूएचओ, टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याला संकेत देत होते. इशारा देऊन सावध करत होते. सोशल डिस्टन्सिंग बाळगा, मास्क लावा याबद्दल आवर्जून सांगत होते. मात्र त्या कालखंडात भाजपाने निवडणुका लादल्या, गर्दीच्या समारंभांना परवानग्या दिल्या. त्याचे भीषण परिणाम दुसर्या लाटेच्यारुपाने पाहायला मिळाले.
भाजपाशासित राज्यांमध्ये आणि बनारस घाटावर एकावेळी २५ ते ३० मृतदेहांना अग्नी दिला जात होता. मृतदेह नदीत वाहून जाताना दिसत होते. ते पाहून देश हादरून गेला. मात्र भाजपाकडून सारं काही आटोक्यात असल्याचं भासवलं जात होतं. अपयश झाकण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या भाजपा नेत्यांकडून आखल्या जात आहेत. लोकांनी भाजपाच्या या दिखाव्याच्या राजकारणात अडकू नये असे आवाहनही क्लाईड क्रास्टो यांनी केले.
केंद्रात विरोधी पक्षांनी एकत्रितपणे येऊन आवाज उठवला की भाजपाचे नेते सांगतात, सगळे विरोधी पत्र एकत्रित आले तरी भाजपाला काही फरक पडणार नाही. असं असेल तर मग भाजपा गेली अनेक दशके एनडीएमध्ये का राहिला आहे. इतका आत्मविश्वास असेल तर भाजपाने एनडीएमधून बाहेर पडून दाखवावे असे थेट आव्हानही क्लाइड क्रास्टो यांनी दिले. यावेळी वसई-विरारचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.