भाजप सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा 'गाढव मोर्चा'
By धीरज परब | Published: February 2, 2024 01:28 PM2024-02-02T13:28:55+5:302024-02-02T13:32:56+5:30
भाजपाने ईडी , इन्कम टॅक्स आदींच्या दबावाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. त्या नंतर जे भाजपा सोबत गेले त्यांच्या विरोधातील कार्यवाही बंद झाली. पण जे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत राहिले व सरकार विरुद्ध आवाज उठवतात त्यांना ईडी आदी यंत्रणांद्वारे कारवाईच्या नावाने धमकावले जात आहे.
मीरारोड - ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स आदी शासकीय संस्था ह्या आता भाजपाचे अंधभक्त कार्यकर्त्यां प्रमाणे राबत असून विरोधी पक्षांना फोडून नेत्यांना भाजपात घेण्यासाठी ह्या सरकारी यंत्रणा दुरुपयोग करत असल्याचा आरोप मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ऍड. विक्रम तारे पाटील यांनी भाजपा व ईडी निषेधार्थ काढलेल्या गाढव मोर्चा प्रसंगी केला.
भाजपाने ईडी, इन्कम टॅक्स आदींच्या दबावाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. त्या नंतर जे भाजपा सोबत गेले त्यांच्या विरोधातील कार्यवाही बंद झाली. पण जे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत राहिले व सरकार विरुद्ध आवाज उठवतात त्यांना ईडी आदी यंत्रणांद्वारे कारवाईच्या नावाने धमकावले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना सुद्धा ईडीच्या कारवाईचा त्रास दिला जात असल्याने भाजपा आणि ईडी सारख्या शासकीय यंत्रणांच्या निषेधार्थ मीरा भाईंदर अपर तहसीलदार कार्यालयावर गाढव मोर्चा गुरुवारी काढण्यात आल्याचे तारे पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. विक्रम तरे पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव अंकुश मालुसरे, जिल्हा कार्याध्यक्ष गुलाम नबी फारुखी, महिला जिल्हाअध्यक्ष वनजारानी नायडू, विनोद जगताप, चिराग कोठारी, मनोज कोतवाल, आशा शिंदे, नवाज गैबी, महादेव शिंदोळकर, हेमलता गायकवाड, फौजिया फारुकी, वीरेंद्र सावंत सह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गाढवाला घेऊन भाईंदर पश्चिम येथे मोर्चा काढला होता.
यावेळी भाजपा सरकार सह ईडी आदी यंत्रणांचा निषेध करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. जनतेचे ऐकू नका पण ह्या गाढवाचे तर ऐका अश्या घोषणा देत शिष्टमंडळाने अपर तहसीलदार निलेश गौंड यांना निवेदन दिले. भाजपा सरकार घाबरलेले आहे. भाजपातील भ्रष्टाचारी व ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या लोकांना भाजपात घेऊन स्वतःचे संख्याबळ वाढवत सत्ता मिळवण्यासाठी हे कारस्थान देशभरात केले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.