वाडा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा
By admin | Published: October 11, 2016 02:42 AM2016-10-11T02:42:46+5:302016-10-11T02:42:46+5:30
वाडा पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापतीपदाची निवडणूक सोमवारी घेण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या
वाडा : वाडा पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापतीपदाची निवडणूक सोमवारी घेण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मृणाली मोतीराम नडगे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. या निवडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपाने जल्लोषात स्वागत केले.
वाडा पंचायत समितीची सदस्य संख्या १२ असून त्यापैकी सत्ताधारी भाजपाचे सहा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक तर शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. भाजपाने शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी समजोता केला आहे. त्यावेळी ठरलेल्या धोरणानुसार सभापतीपद पहिली दीड वर्ष भाजपाला आणि उर्वरित एक राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्याचे ठरले होते. त्यानुसार भाजपाचे अरूण गौंड यांचा दीड वर्षाचा कालावधी संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.
सोमवारी वाडा पंचायत समितीच्या सभागृहात सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपा यांच्या कडून मृणाली नडगे यांचा तर शिवसेने कडून नरेश काळे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र नरेश काळे यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने नडगे या बिनविरोध निवडून आल्या. मृणाली नडगे यांचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, आमदार पांडुरंग बरोरा, भाजपाचे नेते बाबाजी काठोले, उपसभापती नंदकुमार पाटील, भाजपचे वाडा तालुकाध्यक्ष संदिप पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष पांडुरंग पठारे, ज्येष्ठ नेते हरिभाऊ पाटील, अशोक गव्हाळे, हरिश्चद्र पाटील, सुरेश पवार यांनी अभिनंदन केले आहे. पीठासीन अधिकारी म्हणून मोहन नळंदकर यांनी काम पाहिले. (वार्ताहर)