विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांचा अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 12:33 AM2019-10-05T00:33:30+5:302019-10-05T00:34:42+5:30
विक्रमगड विधानसभेत राष्ट्रवादीच्या सुनिल भुसारा यांनी शेवटच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
जव्हार : विक्र मगड विधानसभेत राष्ट्रवादीच्या सुनिल भुसारा यांनी शेवटच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बविआ, सीपीएम आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर लागलीच त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या हेमंत सवरा यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान, भाजपचे विक्रमगड विधानसभेतील नेते हरीश्चंद्र भोये, माजी जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले आणि मधुकर खुताडे यांनीही एकत्रित रॅली काढत आपले अपक्ष अर्ज दाखल केले. यामुळे भाजपला पहिल्याच दिवशी मोठा हादरा बसला आहे. पक्षाने स्थानिक आदिवासींवर अन्याय केला असून या घराणेशाहीला आम्ही विरोध करीत असल्याचे सांगत सवरा यांना खुले आव्हान दिल्याने आता विक्र मगड विधानसभा निवडणूक चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी चांगलेच शक्तीप्रदर्शन केले. यावेळी महाआघाडीच्या सुनील भुसारा यांनी पारंपारिक पद्धतीच्या आदिवासी नृत्यासोबत रॅली काढली. भाजप - सेना युतीचे हेमंत सवरा यांनी जव्हार स्टेडीयम येथून रॅली काढून अर्ज दाखल केला. यावेळी विवेक पंडित, सुरेश जाधव, बाबजी काठोळे आदि उपस्थित होते. या रॅलीत भाजप कार्यकर्ते दुभंगलेले दिसून आले. कारण सवरा यांच्या उमेदवारीनंतर पुन्हा भाजपचे झेंडे आणि चिन्हे घेऊनच अपक्षांनीही अर्ज दाखल केल्याने भाजपचा उमेदवार नेमका कोण असा प्रश्न मतदाराना पडला.
भाजपचे विधानसभेचे दावेदार समजले जाणारे हरिशचंद्र भोये सुरेखा थेतले, मधुकर खुताडे यांनी सवराच्या उमेदवारीला जोरदार विरोध करत आपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. तिन्ही अपक्षांनी एक सोबत रॅली काढत भाजपचेच झेंडे वापरल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बोईसरला ९ उमेदवारी अर्ज दाखल
बोईसर : बोईसर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शुक्रवारी एकूण ९ उमेदवारांनी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यामध्ये बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ११ उमेदवारांनी १७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बहुजन विकास आघाडीतर्फे राजेश पाटील, विष्णू कडव, दिनकर वाढाण (मनसे), किरण मोरे आणि सुनिल गुहे (बहुजन समाज पार्टी), राजेसिंग कोळी (वंचित बहुजन आघाडी), श्याम गवारी (भारतीय ट्रायबल पार्टी), रुपेश धांगडा (संघर्ष सेना), सदू आंधेर- अपक्ष यांनी शुक्रवारी अर्ज भरले. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आ. हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे आ. क्षीतिज ठाकूर, बविआचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील, माजी खासदार बळीराम जाधव व त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उमेदवाराबरोबर उपस्थित होते. बविआतर्फे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.