एनडीआरएफची मदत तोकडीच, पालघरमधील भूकंपग्रस्त त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 06:29 AM2019-02-06T06:29:21+5:302019-02-06T06:29:40+5:30
गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के बसल्याने हादरलेल्या डहाणू व तलासरीवासीयांना धीर देण्यासाठी एनडीआरएफचे बचाव दल दाखल झाले आहे.
तलासरी : गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के बसल्याने हादरलेल्या डहाणू व तलासरीवासीयांना धीर देण्यासाठी एनडीआरएफचे बचाव दल दाखल झाले आहे. मात्र शेकडो गाव-पाड्यांसाठी त्यांनी आणलेल्या फक्त २०० राहुट्यांमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या राहुट्या म्हणजे आमची चेष्टा असून ही मदत तोकडीच असल्याचे दुंदलवाडीतील रहिवाशांनी सांगितले.
गेल्या तीन महिन्यांपासून या भागात भूकंपाच्या धक्क्याने ग्रामस्थ हैराण आहेत. गेल्या शुक्रवारी सलग कंपने आल्याने आणि त्यातील दुपारी दोनच्या दरम्यान आलेल्या भूकंपाने ४.१ रिश्टर स्केलची नोंद केल्याने सगळ्याच शासकीय यंत्रणा हादरल्या आणि लगबगीने एनडीआरएफची टीम येथे रवाना झाली.
मात्र, गाव-पाड्यांची संख्या पाहता एका गावाच्या वाट्याला एक किंवा दोन राहुट्या मोठ्या मुश्किलीने येतील अशी स्थिती आहे. त्यातच त्यांच्या लांबी-रुंदीचा विचार केला तर एका कुटुंबाची सोय त्यात होत आहे. जर एका गावात ७० ते १५० कुटुंबे राहत असतील तर इतरांनी उघड्यावर राहायचे का, असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाऊ लागला आहे. घरापासून दूर राहुटीत रात्री राहिल्यास आपल्या घरी चोरी होण्याची भीती असल्याने ग्रामस्थ तंबूत राहावयास तयार नाहीत. ते घराजवळच उघड्यावर झोपत आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेने घरटी एक तंबूचे वाटप करावे, अशी मागणी पीडितांनी केली आहे. शासनाने दोनशे तंबूंचे वाटप करून भूकंप पीडितांची थट्टा केली असल्याचा आरोप धुंदलवाडीचे सरपंच शिवा महाले यांनी केला आहे.
लोकांना तंबू देण्यात आले असून अजून सर्व्हे चालू आहे. त्याप्रमाणे उपाययोजना करण्यात येतील. लोकांनी ताडपत्रीची मागणी केली असून त्यांना ताडपत्री दिल्यास घराजवळ तंबू स्वत: उभारणार, असे सांगितल्याने ताडपत्री मागविण्यात आल्या आहेत.
- डॉ. प्रशांत नारनवरे,
जिल्हाधिकारी पालघर