वीज पुरवठा खंडित, दुरुस्तीसाठी कर्मचारी विद्युत वाहिनीवर; तितक्यात नदीचा प्रवाह वाढला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 05:24 PM2021-07-24T17:24:31+5:302021-07-24T17:27:58+5:30
विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी नदीवरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीवर प्रवाहात अचानक वाढ
पालघर: राज्यात विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. त्याचबरोबर पावसामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्यानं विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. पालघरमध्येही असाच प्रकार घडला. विशेष म्हणजे वैतरणा नदीच्या पात्रात विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महावितरणाचे कर्मचारी (लाईटमन) गेले होते. मात्र, अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे हे कर्मचारी तिथेच अडकून पडले होते. त्यांना नदीच्या काठावर येणं कठीण होऊण बसलं होतं. अखेर दीड तासांनी एनडीआरएफच्या पथकानं त्यांची सुखरुप सुटका केली.
मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात काल विजेची एक लाईन तुटली होती. त्यामुळे तिच्या दुरुस्तीच्या कामासाठी दोन लाईनमन नदी पात्रात गेले. ते वैतरणा नदीवरील उच्च दाब विद्युत वाहिनीच्या दुरूस्तीचं काम करण्यासाठी गेले. यावेळी नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे लाईनमन नदीपात्राच्या वरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीवरच अडकले. अखेर संध्याकाळी त्यांना नदीपात्रातून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं.
#WATCH | Maharashtra: NDRF rescued 2 Power Dept staff, hanging by safety belts on power cables, as a raging Surya River flowed below them in Manor, Palghar. They were restoring the power supply in the area & had unsuccessfully attempted to reach the other side. (23.07.2021) pic.twitter.com/2iB1j5g98e
— ANI (@ANI) July 24, 2021
मधुकर सातवी आणि प्रदीप भुयाळ अशी या दोन महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. बंद असलेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी नदीत पूर असल्याने हे दोन्ही कर्मचारी विद्युत वाहिनीवरून नदी पार करणार होते. नदीतून आपल्यासोबत कंडक्टर घेऊन जात असताना पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं त्यांना कंडक्टर पुढे घेऊन जाणं अशक्य होतं. नदीचे दोन्ही काठ जास्त अंतरावर असल्यानं दोन्ही कर्मचारी मध्यभागीच अडकले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने या दोन्ही कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पालघरमध्ये दाखल झालेल्या एनडीआरएफच्या टीमला मदतीसाठी बोलवण्यात आलं. त्यानंतर या टीमच्या मदतीने दोन्ही कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली.