वसई मनपात १६०० पदांची गरज
By admin | Published: November 18, 2015 12:11 AM2015-11-18T00:11:06+5:302015-11-18T00:11:06+5:30
महानगरपालिकेने कर्मचारी भरतीसंदर्भातील बिंदुनियमावली शासनाकडे पाठवली असून अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर
वसई : महानगरपालिकेने कर्मचारी भरतीसंदर्भातील बिंदुनियमावली शासनाकडे पाठवली असून अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम जाणवू लागला आहे. अनेक विभागाची कामे ठेकेदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात येत आहेत. ही कामे वेळेवर होत नसल्यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत.
महानगरपालिकेमध्ये गेली ६ वर्षे हजारो कर्मचारी ठेक्यावर काम करीत आहेत. महानगरपालिका निर्मितीच्या वेळी ज्या ग्रामपंचायतींना महानगरपालिकेत सामावून घेण्यात आले. त्या ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना महानगरपालिका सेवेत घेण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा अनुभव तर दुसरीकडे ठेक्यावरील कामगारांना शून्य अनुभव अशा परिस्थितीमध्ये मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेली ६ वर्षे महानगरपालिकेचे प्रशासन चालवले. त्याचा काही प्रमाणात विकासकामांवर परिणामही जाणवला. यासंदर्भात महानगरपालिकेने राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवला असून १६०० पदे त्वरीत भरणे आवश्यक आहे. परंतु राज्यशासनाच्या नगरविकास विभागाकडून याकामी सतत दिरंगाई होत आहे. सध्या महानगरपालिकेचे कामकाज विस्कळीत झाले असून विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले लवकर निघतात परंतु इतर कंपन्यांची बिले मात्र आठ ते नऊ महिने रखडली आहेत. त्यापैकी अनेक बिले हरवल्याचे सांगण्यात येते. महानगरपालिकेचे कामकाज सुचारू पद्धतीने होण्याकरीता महत्वाची पदे त्वरीत भरणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)