मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या ‘सेफ्टी ऑडिट’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2022 05:03 PM2022-09-06T17:03:48+5:302022-09-06T17:04:07+5:30

मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही वर्षांत अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पालघर जिल्ह्यात अपघातप्रवण क्षेत्रातील अपघातांची संख्या काही पटीने अधिक असल्याचे दिसून आलेले आहे. 

Need for 'Safety Audit' of Mumbai-Ahmedabad National Highway | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या ‘सेफ्टी ऑडिट’ची गरज

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या ‘सेफ्टी ऑडिट’ची गरज

googlenewsNext

जगदीश भोवड -

वसई :
उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या पालघर-चारोटी येथे रविवारी झालेल्या अपघाती निधनाने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातांची भीषणता पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. गेल्या वर्षभरात कासा पोलीस स्टेशनअंतर्गत जवळपास १६८ अपघात झालेले आहेत. अन्य भागांतील आकडेवारीही यापेक्षा कमी नाही. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाची रचना, रस्त्यावरील वाहतुकीचा ताण व त्यात अपेक्षित असलेल्या आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन या रस्त्याचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. 

मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही वर्षांत अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पालघर जिल्ह्यात अपघातप्रवण क्षेत्रातील अपघातांची संख्या काही पटीने अधिक असल्याचे दिसून आलेले आहे. 

वसई, नालासोपारा व विरार फाटा या प्रवेश मार्गांवर नेहमीच वाहतूक कोंडी व अपघात होत असतात. यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. तसेच महामार्गावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवून महामार्गाजवळ होणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर तातडीने मार्ग काढायला हवा. 
    - पंकज देशमुख, जिल्हाप्रमुख, शिवसेना, पालघर.

याकडे सरकार लक्ष देणार का?
- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय  महामार्गावरील मेंढवण, सोमटा, तवा, चारोटी, महालक्ष्मी, धनिवरी, आंबोली या भागांमध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. 
- महामार्गावर बंद  पडलेली व अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी आवश्यक यंत्रणेचा अभाव आहे. 
- पाणी निचरा होण्याचे मार्ग बंद झालेले आहेत. पथदिवे बंद असतात. अपघात रोखण्यासाठीच्या कोणत्याच उपाययोजना करण्यात येत नसल्याने महामार्ग समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे.

सहाऐवजी काही ठिकाणी चारच मार्गिका
निविदेत सहा मार्गिका अंतर्भूत असताना प्रत्यक्षात मात्र काही ठिकाणी चार मार्गिका आहेत. आवश्यक त्या ठिकाणी रंबलर्स, कॅट आईज, धोक्याची सूचना देणारे फलक, वेगमर्यादा दर्शवणारे फलक, रिफ्लेक्टर तसेच ५०, १००, २०० मीटरवर झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या तसेच किलोमीटर दर्शक फलक अशा उपाययोजना करणे गरजेचे असताना आवश्यक उपाययोजना करण्याकडे प्राधिकरणाने पाठ फिरवलेली आहे. 

त्यामुळे या महामार्गाची रचना, रस्त्यावरील वाहतुकीचा ताण व आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन या रस्त्याचे ‘सेफ्टी ऑडिट’ करणे गरजेचे असल्याचे मत अनेकजण व्यक्त करीत आहेत. 
 

Web Title: Need for 'Safety Audit' of Mumbai-Ahmedabad National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.