उपप्रदेशातील कृषी क्षेत्र वाचविणे गरजेचे
By admin | Published: June 8, 2015 04:27 AM2015-06-08T04:27:12+5:302015-06-08T04:27:12+5:30
उपप्रदेशामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दीपक मोहिते, वसई
उपप्रदेशामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उपप्रदेशामध्ये सर्वसाधारणपणे १२ ते १५ जूनदरम्यान पावसाला सुरूवात होते. हा अनुभव लक्षात घेऊन शेतकरी शेतीच्या कामाला सुरूवात करतात. परंतु गेल्या काही वर्षात निसर्गाचे चक्र बदलले आहे. जूनमध्ये हजेरी लावणारा पाऊस मध्येच गायब होतो व तो पुन्हा जुलैच्या मध्यास येतो. त्यामुळे पेरलेले बियाणे व खताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशीच स्थिती मागील काही वर्षांत सुरु असल्याने सध्या शेतकरीवर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सध्या शेतीची कामे धिम्या गतीने सुरु आहे.
वसई-विरार उपद्रेशाच्या पूर्व भागातील ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भातशेतीची लागवड केली जाते. ही संपूर्ण शेती पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. शेती सिंचनासाठी पाण्याचे अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने पावसाळी पाण्यावर भातशेती आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या अवकृपेमुळे भातशेतीचे क्षेत्र सतत कमी होत आहे. काही गावात मात्र भातशेती टिकून आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा तर, दुसरीकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची उदासीनता अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी धास्तावला आहे.
पावसाळा तोंडावर आला की, शेतकरी बी-बियाणे व खतासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे फेऱ्या मारतात. परंतु येथील कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेकवेळा तो कंटाळून बाजारात अधिक पैसे मोजून बी-बियाणे व खते खरेदी करतात.
यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी आलेले कृषीसाहित्य मात्र थेट काळ््या बाजारात जातात. खताचा साठा किती येतो व किती शेतकऱ्यांना त्याचे वाटप होते. याचा शोध घेतल्यास गैरप्रकार उघडकीस येईल. परंतु या साखळीत अधिकारीच गुंतले असल्याने चौकशी होणार तशी कशी.
कृषीक्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करणार असे सांगणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या खताचा साठा कुठे जातो,याचा सर्वप्रथम शोध घ्यावा त्यानंतर कृषीक्षेत्र वाढीच्या घोषणा कराव्यात. अशीच स्थिती राहिल्यास उपप्रदेशात जी काही भातशेती शिल्लक आहे ती देखील लयाला जाण्याची भीती आहे.