घरफोड्या करणाऱ्या नेपाळी टोळीला अटक; आरोपी सराईत गुन्हेगार; अन्य गुन्हे उघडकीस येणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:47 AM2020-02-05T00:47:31+5:302020-02-05T00:47:52+5:30
अर्नाळा पोलिसांची कारवाई
नालासोपारा : बंद घरे फोडून चोऱ्या करणाऱ्या चौघांच्या नेपाळी टोळीला अर्नाळा पोलिसांच्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्या - चांदीचे दागिने आणि डॉलरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विरार पश्चिमेकडील आगाशी गावातील चाळपेठ येथील मोरेश्वर विहार बिल्डिंगमध्ये राहणाºया दिलीप ठाकूर (६१) यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी २२ ते २४ जानेवारी दरम्यान घरात प्रवेश करून एकूण २ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती.
घरी आल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्यावर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोड्या लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे आणि पोलीस निरीक्षक महेश शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून गस्त घालण्यास सुरुवात केली.
तांत्रिक कौशल्याचा वापर करून आणि सर्वत्र शिताफीने शोध घेऊन या टोळीला पकडले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दिलीप ठाकूर यांच्या घरी चोरी केल्याचे कबूल केले. त्यांनी अनेक घरफोड्या केल्याचेही पोलिसांना सांगितल्याचे कळते. त्यांच्याकडून पोलिसांनी ६ लाख ३५ हजारांची रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने, अमेरिकन डॉलर, लॅपटॉप, मोबाइल आणि इस्त्री असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दीपक थापा (३२), रोशन शाही (२४), मनबहादूर उपेंद्र उर्फ सहवीर सोनार (सुनार) आणि दीपक उर्फ राजू उर्फ रतन अमर बहादूरशाही (३५) अशी या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.