नेट डाउनमुळे लसीकरणात खाेडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 11:41 PM2021-03-01T23:41:39+5:302021-03-01T23:41:50+5:30
पालघरमध्ये तिसरा टप्पा सुरू; दिवसभरात ८६ नागरिकांनी घेतली कोरोना लस
हितेंन नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : १ मार्चपासून संपूर्ण पालघर जिल्ह्यात कोविड १९ लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली. सरकारी १० लसीकरण केंद्रांवर ६० वर्षे वयोगटावरील ८२ तर ४५ ते ५९ वयोगटातील ४ अशा एकूण ८६ जणांना लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेसाठी नेटचा प्रॉब्लेम असल्याने ही मोहीम राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले.
सोमवारपासून लसीकरणासाठी ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ८२ ज्येष्ठ आणि ४५ वर्षे ते ५९ वर्षे वयोगटातील दुर्धर आजार असलेल्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी प्रमाणित असलेल्या प्रमाणपत्रधारक चार व्यक्तींचे लसीकरण झाले. मोबाइलद्वारे चार लोकांची नोंदणी करण्याची परवानगी आहे. तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी जवळच्या केंद्रावर जाऊन वा कॉलसेंटर क्रमांक १५०७ शी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
या दहा सरकारी केंद्रांत सुरू
डहाणू, जव्हार, कासा उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय पालघर (जेजे हेल्थ युनिट), टिमा हॉस्पिटल, तलासरी, मोखाडा, वाडा, विरार ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र मलवाडा व महापालिकेतील ‘वरुण इंडस्ट्रीज’.
या दहा सरकारी केंद्रांत सुरू
डहाणू, जव्हार, कासा उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय पालघर (जेजे हेल्थ युनिट), टिमा हॉस्पिटल, तलासरी, मोखाडा, वाडा, विरार ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र मलवाडा व महापालिकेतील ‘वरुण इंडस्ट्रीज’.
लसीकरण केलेली केंद्रे
ज्येष्ठ नागरिकांपैकी पालघर ग्रामीण रुग्णालय ११, उपजिल्हा रुग्णालय जव्हार १, डहाणू उपजिल्हा रुग्णालय ९, टिमा हॉस्पिटल २४, ग्रामीण रुग्णालय वाडा १, ग्रामीण रुग्णालय विरार ७, महापालिकेतील ‘वरुण इंडस्ट्रीज’ येथे २९ जणांना लस दिली.
अनेक रुग्णांनी धरला घरचा रस्ता
लसीकरण करण्यासाठी ज्या खाजगी नेट सेवा आरोग्य विभागाने घेतल्या आहेत, त्या सेवा विस्कळीत झाल्याने अनेक रुग्णांची नोंद सॉफ्टवेअरमध्ये होत नव्हती. परिणामी, काही ज्येष्ठ रुग्णांना घरचा रस्ता धरावा लागला. अशा रुग्णांनी मंगळवारी सकाळी नाश्ता करून लसीकरण केंद्रात उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लसीकरणाला हळूहळू सुरुवात करण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिकांनी उद्यापासून आधार कार्ड आणि मोबाइल घेऊन यावे. तसेच खाजगी रुग्णालयांसाठी उद्या लसींचे वाटप करण्यात येणार आहे.
- डॉ. मिलिंद चव्हाण,
सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी
ज्येष्ठ नागरिक म्हणून चांगली वागणूक मिळाली. सुरक्षित अंतर राखून डोस देण्यात आले. ताप आल्यास गोळ्या देण्यात आल्या असून, काही समस्या उद्भवल्यास वैद्यकीय अधीक्षकांचा मोबाइल नंबरही देण्यात आला आहे.
- प्रदीप पाटील, ज्येष्ठ नागरिक, टेंभाेडे