घरमालक भाडेकरुंची माहिती देण्यास उदासीन
By admin | Published: December 21, 2015 11:49 PM2015-12-21T23:49:11+5:302015-12-21T23:49:11+5:30
विक्रमगड तालुक्याच्या निर्मितीनंतर येथील नागरीकरण प्रचंड वाढत असून भाड्याने घर घेऊन राहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी भाडेकरूची माहिती
राहुल वाडेकर, तलवाडा
तलवाडा : विक्रमगड तालुक्याच्या निर्मितीनंतर येथील नागरीकरण प्रचंड वाढत असून भाड्याने घर घेऊन राहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी भाडेकरूची माहिती पोलिसांना देण्याबाबत घरमालक उदासिन आहेत. याचा परिणाम या परीसराच्या सुरक्षिततेवरही होऊ शकतो.
बाहेरील व्यापारी वर्ग येथे व्यवसायाकरिता येत असल्याने लोकसंख्येत भर पडली आहे. ते भाडयाने खोेली, प्लॅट, घर घेऊन राहात आहे. अनेक लोक परराज्यातून येथे येऊन स्थायिक होऊ पाहात आहेत. कोण कुठून येतो कुठे राहातो व कोणता व्यवसाय करतो याबाबत कोणतीही माहिती घरमालक स्वत:जवळही ठेवत नाही की पोलिसांनाही देत नाहीत केवळ भरपूर भाडे मिळविण्याच्या हव्यासापोटी घरमालक कोणालाही खोली भाड्याने देतात. वास्तविक प्रत्येक भाडेकरुकडून करारनामा लिहून घेऊन त्याची संपूर्ण माहिती त्यामध्ये लिहून त्याची एक प्रत संबंधीत स्थानिक पोलीस ठाण्यात देणे आवश्यक आहे, परंतु ते होत नाही. १९९९ साली निर्मिती झालेल्या तालुक्याची लोकसंख्या तेव्हा ८ हजार होती आज १५ ते २० हजाराच्या घरात पोहचली आहे. तर संपूर्ण तालुक्याची लोकसंख्या १ लाख २० हजाराच्या घरात गेली आहे.